

Mahesh Manjrekar Aamne Saamne Controversy: मराठी रंगभूमीवरील 'आमने-सामने' या नाटकातील कलाकारांचा वाद सध्या चर्चेत आहे. अभिनेता रोहन गुजर आणि अभिनेत्री केतकी पालव यांना अचानक नाटकातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मानधनवाढ परवडत नसल्याचं कारण देत निर्माते लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी हा निर्णय घेतल्याचं समोर आलं.
या प्रकरणावर दोन्ही बाजूंनी व्हिडीओच्या माध्यमातून आपली भूमिका मांडल्यानंतर वादावर पडदा पडल्याचं सांगण्यात आलं. मात्र, या घटनेवर आता मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारही प्रतिक्रिया देत आहेत.
अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांनी या संपूर्ण प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. न्यूज 18 मराठीशी बोलताना त्यांनी रोहन गुजर आणि केतकी पालव यांना अचानक नाटकातून काढण्याचा निर्णय योग्य नसल्याचं म्हटलं. तसेच, सात वर्षे नाटकाला साथ देणाऱ्या कलाकारांशी हा विषय अधिक समजूतदारपणे हाताळता आला असता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
महेश मांजरेकर म्हणाले, "मी ते दोन्ही व्हिडीओज पाहिले. मला असं वाटलं की हे खूप अनफेअर आहे. त्यांना असं काढणं योग्य नव्हतं. मी हे नाटक फॉलो केलंय. हे नाटक चांगलंच होतं. आधी नाटक चालायचं नाही, मग त्यांनी ते बंद केलं. पुन्हा सुरू केलं. त्यानंतर कोविड आला. म्हणजे त्यांनीही खूप वाईट परिस्थितीतून या नाटकाला जगवलं आहे."
पुढे बोलताना त्यांनी कलाकार आणि निर्मात्यांमध्ये चर्चा होण्याची गरज व्यक्त केली. "त्या सात वर्षांत हे कलाकार तुमच्यासोबत होते. कोविडमध्येही त्यांनी तुम्हाला साथ दिली. माझं म्हणणं एवढंच आहे की हा विषय अधिक काळजीपूर्वक हाताळता आला असता. त्यांनी किती पैसे मागितले किंवा काय मागणी केली, याची मला माहिती नाही. पण नाटक चांगलं सुरू असताना तुम्ही त्यांना बसवून समजावून सांगू शकला असता. तुम्हाला परवडत नसेल तर त्याबद्दल चर्चा करता आली असती. त्याऐवजी अचानक उद्यापासून नाटकाला येऊ नका, असं सांगणं योग्य वाटलं नाही," असं मांजरेकर म्हणाले.
या घटनेमुळे आपल्याला वाईट वाटल्याचंही महेश मांजरेकर यांनी सांगितलं. "मंगेश आणि लीना यांनी खूप कठीण परिस्थितीतही हे नाटक सुरू ठेवलं. पण आता नाटकाला चांगलं यश मिळत असताना असा निर्णय घेणं मला पटलं नाही. त्यामुळे माझ्या मनात एक वाईट अनुभव राहिला. मला खरंच वाईट वाटलं," अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
महेश मांजरेकर यांनी या वादावर नाराजी व्यक्त केली असली, तरी लीना भागवत आणि मंगेश कदम यांचं कौतुक करायलाही ते विसरले नाहीत. दोघांचाही स्वभाव चांगला असल्याचं सांगत त्यांनी लीना यांच्या अभिनयाचं विशेष कौतुक केलं.
ते म्हणाले, "मंगेश आणि लीना इतकी गोड आहेत. मंगेश तर माझा मित्र आहे. लीना यांचं नाटकातील काम पाहून मी त्यांना म्हटलं होतं की तू जगातली बेस्ट अभिनेत्री आहेस. हिंदीतील एकाही अभिनेत्रीला जवळजवळ तसं काम करता येणार नाही. रोहन आणि केतकीही त्यांना तितकीच चांगली साथ देतात. तुमची भट्टी जमलेली आहे. त्यातले दोन कलाकार गेले तर ते योग्य वाटत नाही. मला असं वाटतं की त्यांनी एकत्र बसून चर्चा करायला हवी होती."
एकूणच, 'आमने-सामने' नाटकातील वादावर महेश मांजरेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कलाकार आणि निर्माते यांच्यात मतभेद होऊ शकतात; मात्र सात वर्षे एकत्र काम केलेल्या कलाकारांना अचानक बाहेर करण्याऐवजी चर्चेतून मार्ग काढायला हवा होता, अशी त्यांची भूमिका आहे.