

अभिनय आणि नृत्याच्या माध्यमातून अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी माधुरी आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कोण होणार करोडपती’ या लोकप्रिय प्रश्नमंजुषा कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकपदाची जबाबदारी माधुरी दीक्षित सांभाळणार असल्याची घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. विशेष म्हणजे, हॉटसीटवर प्रश्नांची उत्तरं देणारी स्पर्धक म्हणून नव्हे, तर समोर बसलेल्या स्पर्धकांशी संवाद साधणारी होस्ट म्हणून माधुरी दिसणार आहे.
कार्यक्रमाची नोंदणी सुरू झाल्याने आता या शोची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. माधुरीसाठी मात्र हा कार्यक्रम केवळ क्विझ शो किंवा पैशांची बक्षिसं जिंकण्याचा खेळ नाही. या मंचावर येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाची कहाणी, त्यांची स्वप्नं आणि त्या स्वप्नांसाठी त्यांनी केलेला संघर्ष यामुळे ती या कार्यक्रमाकडे विशेष आकर्षणाने पाहते.
आपल्या नव्या भूमिकेबद्दल बोलताना माधुरीने सांगितले की, स्पर्धकांच्या आयुष्याच्या कथा जाणून घेण्याची तिला सर्वाधिक उत्सुकता आहे. तिच्या मते, ‘कोण होणार करोडपती’ हा फक्त प्रश्नांची योग्य उत्तरं देऊन रक्कम जिंकण्याचा कार्यक्रम नाही, तर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची आणि मोठी स्वप्नं पाहण्याची प्रेरणा देणारा अनुभव आहे.
अभिनेत्री म्हणून माधुरीने असंख्य व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. मात्र, सूत्रसंचालक म्हणून ती कोणतीही व्यक्तिरेखा साकारणार नसून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वासह प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे तिचा एक अधिक मोकळा, सहज आणि उत्स्फूर्त अंदाज पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.
माधुरीच्या मते, स्पर्धकांशी मनमोकळ्या गप्पा मारणे, त्यांच्या आयुष्यातील चढ-उतार जाणून घेणे आणि त्यांच्या स्वप्नांशी जोडले जाणे हा या कार्यक्रमाचा सर्वात सुंदर भाग असेल. प्रत्येक व्यक्तीसोबत वेगळी कहाणी, वेगळ्या भावना आणि वेगळे क्षण अनुभवायला मिळणार असल्याने हा प्रवास तिच्यासाठीही खास असणार आहे. प्रश्नांची उत्तरं, आनंदाचे क्षण, भावनिक प्रसंग आणि अचानक मिळणारी आश्चर्याची वळणं यामुळे प्रत्येक भाग वेगळा रंग घेईल.
अनेक दशकांपासून आपला अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी माधुरी आता ‘कोण होणार करोडपती’च्या माध्यमातून त्यांच्याशी थेट संवाद साधताना दिसणार आहे. तिच्या सहज आणि आपुलकीच्या सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमातील स्पर्धकांच्या कथा आणि त्यांची स्वप्नं अधिक जवळून प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे माधुरीचा हा नवा अंदाज पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लवकरच फक्त सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर हा कार्यक्रम पाहता येणार आहे.