

kuku kohli director who changed ajay devgn fortunes passes away
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेत्री अरुणा ईरानी यांचे पती कुकू कोहली यांचे निधन झाले. वयाच्या ७७व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. आज कुकू कोहली यांचे पार्थिव पंचतत्वात विलीन झाले.
दरम्यान, अंत्यसंस्कारावेळी अभिनेता गजेंद्र चौहान, विकी कौशल-कॅटरीना, शर्वरी वाघ, रजत बेदी, जावेद अख्तर-शबाना आझमी, टीकू तलसानिया उपस्थित राहिले. दरम्यान, अभिनेता अजय देवगणने एक्स अकाऊंटवर ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
कुकू कोहली आणि अजय देवगण यांचे खास नाते
अजय देवगणने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली. अजयने ट्विटमध्ये लिहिलं- ''काही माणसं आपल्या आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकतात. माझ्यासाठी 'कुकू जी' अशाच व्यक्तींपैकी एक होत्या. माझ्यावर तुम्ही दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी सदैव ऋणी राहीन. तुमची खूप आठवण येईल, कुकू जी. ओम शांती.''
अजयला कुकू कोहली यांनी ‘फूल और कांटे’ चित्रपटात लॉन्च केलं होतं. ज्यामुळे अजय देवगणचे नशीब कायमचे पालटले. हा चित्रपट १९९१ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन कुकू कोहली यांनी केले होते. या चित्रपटानंतर अजय देवगणचे नशीबच पालटले होते. यानंतर दोघांनी ‘सुहाग’ या चित्रपटासाठीही एकत्र काम केले. या चित्रपटात अजय देवगणसोबत अक्षय कुमार, करिश्मा कपूर आणि नगमा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तसेच कुकू कोहली यांनी ‘हकीकत’, ‘कोहराम’, ‘बादशाह’, ‘हलचल’ या चित्रपटांचेही दिग्दर्शन केले आहे.
कुकू कोहली यांनी अभिनेत्री अरुणा ईरानी यांच्यासोबत विवाह केला होता. त्यांच्या पहिल्या विवाहातून त्यांना दोन मुली आहेत. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
(video- viralbhayani insta वरून साभार)