Shah Rukh Khan King Movie: थिएटरमध्ये येण्याआधीच ‘किंग’चा जलवा! ४०० कोटींच्या चित्रपटाने कमावले ८०० कोटी, कमाईचं गणित काय?

Shah Rukh Khan King Movie: शाहरुख खानच्या आगामी ‘किंग’ चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच 835 कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
Shah Rukh Khan King Movie
Shah Rukh Khan King MoviePudhari
Published on: 
Updated on: 

Shah Rukh Khan King Movie: बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दमदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. तब्बल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शाहरुख खानचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या आगामी ‘किंग’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याने कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुमारे 400 कोटी रुपये बजेट असलेल्या ‘किंग’ चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच विविध व्यावसायिक करारांच्या माध्यमातून तब्बल 835 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच तो चर्चेचा विषय बनला आहे.

‘किंग’ने रिलीजपूर्वी 835 कोटी रुपये कसे कमावले?

शाहरुख खानच्या ‘किंग’ चित्रपटाचे डिजिटल, थिएटर, परदेशातील वितरण, टीव्ही आणि संगीताचे हक्क विकण्यात आले आहेत. या सर्व करारांमधून चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठी रक्कम मिळाल्याचे सांगितले जात आहे. या व्यवहारांमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याची कमाई 835 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

ओटीटी हक्कांसाठी नेटफ्लिक्सने मोजले 275 कोटी

‘किंग’ चित्रपटाच्या ओटीटी हक्कांची मोठ्या रकमेत विक्री झाल्याची चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे सर्व भाषांमधील जागतिक डिजिटल स्ट्रीमिंग हक्क तब्बल 275 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच निर्मात्यांना मोठी रक्कम मिळाली आहे.

थिएटरमधील प्रदर्शनाचे हक्क 250 कोटींना विकले

चित्रपटाच्या थिएटरमधील प्रदर्शनाचे हक्कही मोठ्या रकमेत विकले गेल्याचे समोर आले आहे. पेन मरुधर या कंपनीने ‘किंग’चे भारतातील वितरण हक्क मिळवले आहेत. यासाठी कंपनीने सुमारे 250 कोटी रुपये मोजल्याची माहिती आहे.

परदेशातील हक्कांसाठी 175 कोटींचा करार

केवळ भारतातच नाही, तर परदेशातही ‘किंग’ची मोठी मागणी असल्याचे दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फार्स फिल्म्सने या चित्रपटाचे परदेशातील थिएटर प्रदर्शनाचे हक्क मिनिमम गॅरंटी कराराअंतर्गत मिळवले आहेत. यासाठी कंपनीने सुमारे 175 कोटी रुपये दिल्याचे सांगितले जात आहे.

टीव्ही आणि संगीताच्या हक्कांतूनही मोठी कमाई

‘किंग’ चित्रपटाने टीव्ही आणि संगीताच्या हक्कांमधूनही मोठी कमाई केली आहे. या चित्रपटाचे सॅटेलाइट म्हणजेच टीव्हीवरील प्रसारणाचे हक्क सुमारे 90 कोटी रुपयांना विकल्याची माहिती आहे. तर संगीताच्या हक्कांसाठी जवळपास 45 कोटी रुपयांचा करार झाल्याचे वृत्त आहे. या सर्व व्यवहारांची बेरीज केल्यास चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीची कमाई 835 कोटी रुपयांपर्यंत पोहोचते.

Shah Rukh Khan King Movie
Dia Mirza Video: 'पैसे घेतलेले नाहीत...', दीया मिर्झाचा 'तो' व्हिडिओ अचानक डिलीट! अमित साटम यांच्या एका पोस्टनंतर BMCने घेतला निर्णय

रिलीजपूर्वीच 435 कोटी रुपयांचा नफा?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘किंग’ चित्रपटाचे अंदाजे बजेट 400 कोटी रुपये आहे. तर विविध हक्कांच्या विक्रीतून त्याने 835 कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याचा दावा केला जात आहे. या आकडेवारीनुसार, निर्मात्यांना बजेटच्या तुलनेत 435 कोटी रुपये अधिक मिळाल्याचे दिसते.

मात्र, ही रक्कम म्हणजे चित्रपटाचा निव्वळ नफा आहे असे नाही. चित्रपटाच्या निर्मिती, प्रसिद्धी आणि वितरणाशी संबंधित इतर खर्चांचाही विचार करावा लागतो.

‘किंग’मध्ये शाहरुखसोबत कोणते कलाकार दिसणार?

‘किंग’ चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. यापूर्वी त्यांनी शाहरुख खानसोबत ‘पठाण’ हा ब्लॉकबस्टर चित्रपट केला होता. त्यामुळे या जोडीकडून प्रेक्षकांना पुन्हा एकदा मोठ्या अपेक्षा आहेत.

या चित्रपटात शाहरुख खानसोबत त्याची मुलगी सुहाना खान, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी आणि राघव जुयाल यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

Shah Rukh Khan King Movie
New Airfare Rules 2027: विमान प्रवास महागणार? कंपन्यांना तिकिटांचे दर ठरवण्याचे स्वातंत्र्य; हवाई भाड्याबाबत नवा नियम

‘किंग’ कधी प्रदर्शित होणार?

शाहरुख खानचा ‘किंग’ हा चित्रपट 24 डिसेंबर 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे नाताळच्या सुट्ट्यांमध्ये शाहरुखच्या चाहत्यांना त्याचा नवा चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. आता प्रदर्शनापूर्वीच 835 कोटी रुपयांच्या कमाईचा दावा होत असल्याने ‘किंग’ चित्रपट प्रत्यक्ष बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.