Dia Mirza Video: 'पैसे घेतलेले नाहीत...', दीया मिर्झाचा 'तो' व्हिडिओ अचानक डिलीट! अमित साटम यांच्या एका पोस्टनंतर BMCने घेतला निर्णय

Dia Mirza Diwali Campaign: मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीत फटाके न फोडण्याचे आवाहन करणारी जनजागृती मोहीम महापालिकेने सुरू केली आहे.
Dia Mirza Diwali Campaign Video
Dia Mirza Diwali Campaign VideoPudhari
Published on: 
Updated on: 

Dia Mirza Diwali Campaign: मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. यासाठी महापालिकेकडून विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येत असून, नागरिकांनी फटाके फोडणे टाळावे आणि ध्वनी व वायुप्रदूषण रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे सांगण्यात येत आहे.

या मोहिमेसाठी महापालिकेने काही प्रसिद्ध कलाकारांची मदत घेतली आहे. मात्र, या मोहिमेत अभिनेत्री दीया मिर्झाचा समावेश केल्याने आता नवा वाद निर्माण झाला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी यावर आक्षेप घेत महापालिका प्रशासनावर टीका केली. त्यानंतर काही तासांतच महापालिकेने दीया मिर्झाचा जनजागृतीपर व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवला.

दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवण्याची गरज नाही; अमित साटम यांची टीका

मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत महापालिकेच्या मोहिमेवर नाराजी व्यक्त केली. अभिनेत्री दीया मिर्झाच्या माध्यमातून मुंबईकरांना दिवाळी कशी साजरी करावी, याचे धडे देण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले.

"आम्हाला आमची दिवाळी कशी साजरी करायची, यावर दीया मिर्झाकडून धडे घेण्याची अजिबात गरज नाही. आमच्या परंपरा आणि संस्कृती आमच्या जीवनात खोलवर रुजलेल्या आहेत," अशा शब्दांत अमित साटम यांनी आपली भूमिका मांडली.

साटम यांच्या या पोस्टनंतर महापालिकेच्या जनजागृती मोहिमेवरून राजकीय चर्चा सुरू झाली. भाजपकडून आक्षेप घेतल्यानंतर महापालिकेने दीया मिर्झाचा व्हिडिओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हटवला.

दीया मिर्झासह अनेक सेलिब्रिटींचा मोहिमेत सहभाग

मुंबईतील प्रदूषणाची समस्या लक्षात घेऊन महापालिकेने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सेलिब्रिटींची मदत घेण्याचे ठरवले आहे. या मोहिमेत अभिनेत्री दीया मिर्झासोबतच क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अभिनेता स्वप्नील जोशी यांचाही समावेश करण्यात आला आहे.

या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांना दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके न फोडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे, तसेच फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण टाळावे, असा संदेश सेलिब्रिटींच्या व्हिडिओमधून दिला जात आहे.

महापालिकेने हटवलेल्या व्हिडिओमध्ये दीया मिर्झानेही मुंबईकरांना प्रदूषण टाळण्याचे आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते. मात्र, भाजपच्या आक्षेपानंतर हा व्हिडिओ काही तासांतच हटवण्यात आला.

व्हिडिओ हटवल्यानंतर दीया मिर्झाची प्रतिक्रिया

महापालिकेने आपला व्हिडिओ हटवल्याची बातमी समोर आल्यानंतर दीया मिर्झाने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. या मोहिमेसाठी आपण कोणतेही पैसे घेतले नसल्याचे तिने स्पष्ट केले.

"कोणतेही पैसे घेतलेले नाहीत. आता तर चांगुलपणाचा जमनाच राहिला नाही," अशा आशयाची टिप्पणी दीया मिर्झाने केली. पर्यावरणाच्या रक्षणासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने केलेल्या आवाहनावरून वाद निर्माण झाल्याने तिच्या प्रतिक्रियेचीही चर्चा सुरू झाली आहे.

Dia Mirza Diwali Campaign Video
Gold Silver Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आठवड्याच्या सुरुवातीलाच दर कोसळले; 24 आणि 22 कॅरेटचे आजचे दर किती?

महापालिका प्रशासनाने काय सांगितले?

महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने या मोहिमेमागील भूमिका स्पष्ट केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावर निर्बंध घातले आहेत. तसेच केवळ पर्यावरणपूरक फटाक्यांचा वापर करण्याबाबत निर्देश दिले आहेत. या न्यायालयीन निर्देशांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावी, यासाठी सेलिब्रिटींच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

Dia Mirza Diwali Campaign Video
New Airfare Rules 2027: विमान प्रवास महागणार? कंपन्यांना तिकिटांचे दर ठरवण्याचे स्वातंत्र्य; हवाई भाड्याबाबत नवा नियम

दरम्यान, मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे प्रदूषणात आणखी वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडणे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन करावे आणि पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करावा, यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. मात्र, पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत दीया मिर्झाच्या सहभागावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.