अभिनेते किरण माने यांना सातार्‍यातून पाठिंब्याचा ट्रेंड

अभिनेते किरण माने यांना सातार्‍यातून पाठिंब्याचा ट्रेंड
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा, एका राजकीय पोस्टमुळे सातार्‍याचे प्रसिध्द अभिनेते किरण माने यांना एका वाहिनीवरील मालिकेतून काढण्यात आले असून या घटनेचे पडसाद आता सोशल मीडिया, मनोरंजन क्षेत्रासह राजकीय पटलावरही उमटू लागले आहेत. सातारा जिल्ह्यातून आपल्या या सुपुत्रासाठी सोशल मीडियावर नेटकर्‍यांनी पाठिंब्याचा हॅशटॅग चालवला आहे. किरण माने यांच्या भूमिकेचे जिल्हाभरातून जोरदार स्वागत होत असून त्यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे.

एका वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेत सातार्‍याचे अभिनेते किरण माने यांनी साकारलेलं विलास पाटील हे पात्र लोकप्रिय झाले. अभिनेता किरण माने हे त्यांच्या फेसबूक पेजवरुन अनेक विषयांवर बेधडकपणे भाष्य करत असतात. त्यातच त्यांची एक राजकीय पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. त्यामुळे किरण माने यांना संबंधित मालिकेतून वगळण्यात आले.

याबाबतचे वृत्त सातारा शहरासह जिल्ह्यात पसरताच किरण माने यांच्या भूमिकेला जोरदार पाठिंबा दिला गेला. सोशल मीडियावर नेटकर्‍यांनी किरण माने यांची भूमिका चांगलीच उचलून धरली. सगळ्या प्रकाराविषयी जिल्ह्यातून संताप व्यक्त होत आहे. फेसबूक, व्हॉटस्अ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्रामवरुन नेटकर्‍यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली. त्याचबरोबर सामाजिक, राजकीय व कला-मनोरंजन क्षेत्रातूनही किरण माने यांना पूरक अशी भूमिका घेण्यात आली.

सातारा हे वैचारिक, सांस्कृतिक व पुरोगामी वारसा जोपासणारे शहर आहे. सातार्‍याच्या या प्रतिमेला धक्का बसेल असे कृत्य व कोणतीही कारवाई खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा अनेकांनी दिला. किरण माने यांना मालिकेतून वगळण्याचा निर्णय हा सांस्कृतिक दहशतवाद असल्याचे सांगत सातारकरांनी निषेध नोंदवला आहे.

कारवाईप्रश्नी बोलताना गुणी कलावंत किरण माने यांनी परखड मत व्यक्त केले आहे. शिवबा-तुकोबांच्या आणि शाहू-फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे घडलं आहे, हे लक्षात ठेवा. या महाराष्ट्रात अशी झुंडशाही खरं तर खपवून घेतली जाऊ नये. माझ्या उदाहरणामधून काय घडणार आहे, हे आपण पाहूयात.

यात जर मला न्याय मिळाला नाही तर आता झुंडशाहीविरोधात बोलायला कुणीच धजावणार नाही, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. मला न्याय मिळाला तर खूप लोक याविरोधात बोलायला पुढे येतील, काय करायचंय हे लोकांनी ठरवावं. माझ्या सगळ्या पोस्ट्स वाचा, त्यामध्ये कुठेही जातीवादी विखार दिसणार नसल्याचे किरण माने यांनी म्हटले आहे. त्यांच्या या मतावर सातार्‍यातून पाठिंब्याचा जोरदार हॅशटॅग ट्रेंड पहायला मिळाला.

हेही वाचंलत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news