IND vs SA : भारत दक्षिण आफ्रिकेत ३० वर्षांपासून मालिका का जिंकू शकला नाही? | पुढारी

IND vs SA : भारत दक्षिण आफ्रिकेत ३० वर्षांपासून मालिका का जिंकू शकला नाही?

IND vs SA : केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसर्‍या आणि निर्णायक कसोटी सामन्याची सांगता दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने झाली. तब्बल 7 गडी राखून भारतावर मात करत दक्षिण आफ्रिकेने ही कसोटी मालिका 2-1 फरकाने जिंकली. यंदाच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ अपयशी ठरल्याने कसोटी मालिका न जिंकण्याची परंपरा कायम राहिली.

1992-93 पासून सुरू झालेली द्विपक्षीय कसोटी मालिका आजपर्यंत भारत त्यांच्या देशात एकदाही जिंकलेला नाही. गेल्या 30 वर्षांत भारताने दक्षिण आफ्रिकेत एकूण 23 कसोटी सामने खेळले असून, आजपर्यंत त्यातील केवळ तीनच सामने जिंकलेले आहेत. 1992-93 मध्ये झालेल्या पहिल्या वहिल्या दक्षिण आफ्रिका दौर्‍यात मोहम्मद अझरुद्दीनने भारताचे नेतृत्व केले होते. 1996-97 मध्ये सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालीही भारत फारशी चमक दाखवू शकला नव्हता.

2001-02 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत गेलेल्या भारतीय संघाच्या पदरीही निराशाच पडली. 2006-07 च्या दक्षिण आफ्रिका दौर्‍यात भारताने राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकण्याची कमाल केली; पण मालिका विजय मात्र दूरच राहिला.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2010-11 ची कसोटी मालिका अनिर्णीत राखण्यात भारताला यश आले. हीच काय ती भारताची आजवरची दक्षिण आफ्रिकेतील सर्वोत्तम कामगिरी! पुढे 2013-14 मध्ये मात्र धोनी आपल्या कर्णधारपदाचा करिश्मा दाखवू शकला नाही आणि भारत पुन्हा एकदा अपयशी ठरला. (IND vs SA)

IND vs SA भारताला यंदाचेही तिळगूळ कडूच

2021-22 च्या कसोटी मालिकेची सुरुवात भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली केली आणि पहिलाच सामना मोठ्या फरकाने जिंकला; पण पुढच्या दोन्ही सामन्यांत दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व मिळविण्यात भारत सपशेल अपयशी ठरला. दुसर्‍या सामन्यात कर्णधार लोकेश राहुल तर तिसर्‍या सामन्यात कर्णधार विराट कोहली भारताला विजयपथावर नेऊ शकले नाहीत.

गेल्या तीस वर्षांत झालेल्या सहांपैकी एकाही कसोटी मालिकेत भारताला विजेतेपद मिळालेले नाही. यावर्षीची ही सातवी मालिकाही जिंकता न आल्याने भारताला यंदाचेही तीळगूळ कडूच लागले.

Back to top button