

Dhurandhar 2 Teaser:
मुंबई:
'धुरंधर'च्या प्रचंड यशानंतर, रणवीर सिंग लयारी शहरावर कसा आणि कोणत्या प्रकारे ताबा मिळवतो हे पाहण्यासाठी प्रेक्षक त्याच्या पुढील भागाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट या वर्षी मार्चमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मंगळवारी (दि. ३) निर्मात्यांनी बहुप्रतिक्षित 'धुरंधर २: द रिव्हेंज'चा पहिला टीझर प्रदर्शित केला आहे.
५ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर'ने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले होते. 'धुरंधर'ने जगभरात १३०० कोटींहून अधिक कमाई केली होती. नुकताच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला असून तिथेही त्याने आपली छाप पाडली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानमध्येही हा चित्रपट ट्रेंड करत आहे. चित्रपटाबद्दल असलेल्या या जबरदस्त क्रेझ दरम्यान, आता निर्मात्यांनी चाहत्यांना दुसऱ्या भागाच्या टीझरची भेट दिली आहे. १९ मार्चला हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.
'धुरंधर २' चा टीझर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून सर्वत्र फक्त रणवीर सिंहच्या डायलॉगची चर्चा आहे. टीझरमध्ये पहिल्या भागातील कथेचा पुढचा भाग दाखवण्यात आला आहे. टीझरची सुरुवात रणवीर सिंगच्या पात्राच्या तरुण रूपाने होते. यात हमजा मजारी लियारी शहरावर आपले वर्चस्व प्रस्थापित करताना दिसत आहे. १.१२ मिनिटांच्या या टीझरवरून हे स्पष्ट होते की, हा स्पाय थ्रिलर चित्रपट रणवीर सिंग हेर बनण्यापूर्वीच्या आयुष्यावर प्रकाश टाकणार आहे. टीझरचा शेवट अत्यंत दमदार डायलॉगने होतो, जिथे रणवीर 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' मधील तो प्रसिद्ध संवाद म्हणतो: "ये नया हिंदुस्तान है, ये घर में घुसेगा भी और मारेगा भी."
टीझर प्रदर्शित होण्यापूर्वी, निर्मात्यांनी चित्रपटाचे एक नवीन पोस्टर अनावरण केले होते, ज्यामध्ये रणवीर सिंग एका आक्रमक अवतारात दिसत आहे. त्याने स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर हे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये "अब बिगडने का वक़्त आ गया है" असे लिहिले होते.
दरम्यान, 'धुरंधर २' मध्ये हमजाच्या पाकिस्तानातील गुप्त मोहिम दाखवली जाणार आहे. जसकीरत सिंह रंगी नक्की कोण आहे आणि अजय सान्यालने (आर. माधवन) त्याला हमजा बनवून पाकिस्तानात का पाठवले, या प्रश्नांची उत्तरे या भागात मिळतील. निर्माते आणि कलाकारांच्या दाव्यानुसार, दुसरा भाग पहिल्या भागापेक्षा ५० पटीने अधिक रोमांचक आणि ॲक्शनने भरलेला असेल.