चाबुक सिनेमा २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहात

चाबुक सिनेमा २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहात
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

जीवन म्हणजे नात्या-गोत्यांची घट्ट वीण, वेगवेगळ्या नात्यांच्या प्रेमळ बंधांनी आपण ती विणत असतो. मध्येच विसंवादाची गाठ बसली, तर नात्यांचे बंध ताणले जातात धागा तुटतो. कधी कधी भान राखून वेळीच नात्यांचा तोल सावरलाही जातो. पण खरा गोंधळ उडतो मनं सांभाळताना. यावर आत्मपरीक्षण हाच उपाय असून ज्याचा त्यानेच शोधायचा हे सांगू पाहणारा 'चाबुक' हा चित्रपट २५ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. श्रीष्टी मोशन पिक्चर कंपनी' बॅनरअंतर्गत 'चाबुक' या मराठी चित्रपटाच्या निर्मिती झाली.

दिग्दर्शनाची धुरा कल्पेश भांडारकर यांनी सांभाळली आहे. कल्पेश भांडारकर हे हिंदी सिनेसृष्टीतील एक नावाजलेलं नाव. अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांचे छायाचित्रण आणि दिग्दर्शन करत कल्पेश भांडारकर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी छाप पाडली आहे. आपले थोरले बंधू श्मधुर भांडारकर यांच्यासह कल्पेश यांनी हिंदीतल्या अनेक दिग्गजांसोबत चित्रपट केले आहेत. यानंतर ते आता स्वत:ची पहिली मराठी चित्रकृती घेऊन येत आहेत.

'चाबुक' चित्रपटात अभिनेता समीर धर्माधिकारी व अभिनेत्री स्मिता शेवाळे मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत सुधीर गाडगीळ आणि मिलिंद शिंदे यांच्यासुद्धा भूमिका आहेत.

आजच्या युगात भौतिकतेने आपण समृध्द होत असू मात्र, माणसांचा माणसाशी संवाद कमी होत चालला आहे. त्यावर वेळीच अनुभव आणि निरीक्षणाच्या मदतीने आत्मपरीक्षणाचा 'चाबुक' ओढण्याची गरज आहे. हे दाखवून देणारा 'चाबुक' चित्रपट एका कुटुंबाची कथा आपल्यासमोर मांडतो.

'काहीतरी' मिळवण्याच्या ध्यासापायी आपल्या हातातून बऱ्याच गोष्टी निसटत चालल्या आहेत याची जाणीव चित्रपटाच्या नायकाला नसते. ती जाणीव दोन फॅण्टसी फॅक्टर व्यक्तिरेखांच्या माध्यमातून फार भन्नाट पद्धतीने या चित्रपटात करुन देण्यात आली आहे. ते चित्रपटात बघणे प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक असणार आहे.

'मध्यमवर्गीय मानसिकतेवर आधारलेले बरेच चित्रपट बनतात. पण आपण काहीतरी वेगळं करूया, जे मनाला लागेल, हृदयाला भिडेल हा प्रमुख विचार चित्रपट निर्मीतीमागे होता. एखादी गोष्ट मनाला लागली तर बदल नक्की होतो, हे सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला असल्याचे दिग्दर्शक कल्पेश भांडारकर सांगतात.

'चाबुक' चित्रपटाची कथा अभय इनामदार आणि निरंजन पटवर्धन यांची आहे. गीते मंदार चोळकर आणि मिलिंद शिंदे यांनी लिहिली असून संगीत विपीन पटवा यांचे आहे. चित्रपटातील सुमधुर गीतांना बेला शेंडे, ब्रिजेश शांडिल्य, विपिन पटवा यांचा स्वरसाज लाभला आहे.
येत्या २५ फेब्रुवारीला 'चाबुक' चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news