सातार्‍यात शिक्षकाविरुद्ध पोक्सो | पुढारी

सातार्‍यात शिक्षकाविरुद्ध पोक्सो

सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातार्‍यात एका शिक्षकाने विद्यार्थिनीला जवळ बोलावून तिच्यासोबत अश्‍लील वर्तन केल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात विनयभंगासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकाला पोलिसांनी अटक केली असून या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. घटनेतील पीडित मुलगी 12 वर्षांची आहे. ही घटना दि. 22 रोजी सकाळी शाळेतच घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शिक्षकाने मुलीला एकटीला बोलावून तिच्यासोबत अश्‍लील चाळे केले. या घटनेने मुलगी घाबरली. तिने तिची सुटका करुन घेतली व वर्गात येवून बसली. मात्र घडलेल्या घटनेमुळे तिची मानसिक स्थिती बिघडली व तिला रडू कोसळले.

शाळेतच मुलगी रडू लागल्यानंतर खळबळ उडाली. इतर मुलांमध्ये चलबिचल वाढल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक, इतर शिक्षक तेथे आले. सर्वांनी मुलीला बोलते केल्यानंतर तिने घडलेल्या घटनेची माहिती दिली. ही माहिती ऐकून इतर शिक्षक हादरुन गेले. तात्काळ मुलीच्या कुटुंबियांना बोलावून त्यांना माहिती दिली. मुलीच्या कुटुंबियांनी शहर पोलिस ठाणे गाठल्यानंतर मंगळवारी रात्री उशीरा शिक्षकाविरुध्द विनयभंगासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्यानंतर शिक्षक असलेल्या संबंधित संशयिताला अटक केली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button