

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बिग बॉस मराठी'च्या घरात कधी काय वादळ येईल हे सांगू शकत नाही. सोशल मीडिया गाजवणारी मालवणी चेडू अंकिता वालावलकर 'बिग बॉस मराठी'च्या घरात धमाका करताना दिसून येत आहे. 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरला निक्की तांबोळीमुळे 'बिग बॉस मराठी'च्या घरात अश्रू अनावर झाले आहेत. आता 'बिग बॉस मराठी'च्या घरात अंकिता रडत बसणार की सदस्यांना कोकणी हिसका दाखवणार हे पाहावे लागेल.
'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात अंकिता निक्कीला म्हणते,"मला तुझ्यासोबत पाडापाडीचं काही खेळायचं नाही. तू माझ्यापासून लांब राहा". त्यावर निक्की तिला म्हणते,"तू दूर जा...माझी मर्जी..तुला मला उचलून घ्यायचंच नाही आहे". पुढे अंकिला तिला उचलून घेत म्हणते,"तुला आता मी असं उचलून घेऊ का?". अंकिताने उचलून घेतल्याने निक्कीला राग येतो आणि ती म्हणते,"माझे हात पाहायचे आहेत का तुला कसे चालतात... परत हात लावलास तर तुझं तोंड मी खलबत्त्याने ठेचेल". त्यानंतर अंकिता सर्व सदस्यांपासून दूर जाते आणि ढसाढसा रडते.
'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता प्रभू-वालावलकरने रितेश देशमुखसमोर गाऱ्हाणं घालत 'बिग बॉस मराठी'च्या घरात प्रवेश केला होता. पण हा मालवणी चेडू पहिल्याच आठवड्यात नॉमिनेट झाला आहे. आता अंकिता वालावलकरचा 'बिग बॉस मराठी'च्या घरातील प्रवास संपणार की पुढे सुरू राहणार हे प्रेक्षकांना लवकरच कळेल.