पुढारी ऑनलाईन डेस्क : 'ऐ जिंदगी' चित्रपटाचं पोस्टर आणि ट्रेलर सोशल मीडियावर सध्या ट्रेंडिंग होत आहे. (Aye Zindagi film) एका सत्यकथेवर आधारित असलेला 'ऐ जिंदगी' हा चित्रपट एका २६ वर्षीय विनय चावलाचा प्रवास सादर करणारा आहे. विनयची रुग्णालयातील सल्लागार रेवती यांच्याशी संभव नसलेला बंध, त्याच्या जीवनावरील आशा आणि विश्वास पुन्हा जागृत करतो आणि त्याला मानवतेच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवायला लावतो. (Aye Zindagi film)
'ऐ जिंदगी' हा चित्रपट विविध कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. त्यापैकी मुख्य कारण म्हणजे दक्षिणेकडील ज्येष्ठ अभिनेत्री आणि तीनवेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर आपले नाव कोरणाऱ्या रेवती यांचे हिंदी चित्रपटसृष्टीत मुख्य भूमिकेतील पुनरागमन हे आहे. या चित्रपटात 'मुंबई डायरीज'मधील ब्रेकआउट स्टार सत्यजीत दुबे, ज्येष्ठ गुजराती अभिनेते हेमंत खेर, श्रीकांत वर्मा, सावन टँक, मुस्कान अग्रवाल आणि प्रांजल त्रिवेदी या कलाकारांसोबत 'चि. व चि. सौ. कां.' फेम आपली मराठमोळी लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी गोडबोले 'ऐ जिंदगी' द्वारे नव्या क्षितिजाकडे वाटचाल करीत आहे.
मृण्मयी गोडबोले म्हणाली की, 'ऐ जिंदगी' ही आशा, प्रेम आणि उभारीची कथा आहे. यात खूप आपलेपणाचे वातावरण असल्याने प्रेक्षक प्रत्येक कॅरेक्टरशी स्वत:ला रिलेट करतील. या चित्रपटात एका मल्याळम नर्सची भूमिका माझ्यासाठी नवीन आणि आव्हानात्मक होती. या चित्रपटाच्या कास्ट–क्रू सोबत काम करणे हा माझ्यासाठी एक अद्भुत अनुभव होता. 'ऐ जिंदगी' हा चित्रपट येत्या १४ ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशात आणि उत्तर अमेरिकेतील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. ती माझ्यासाठी विशेष आनंदाची बाब म्हणता येईल.
'बॉम्बे रेन्स', 'बॉम्बे गर्ल्स', 'माईस इन मेन' आणि 'द डेथ ऑफ मिताली दत्तो' या कादंबऱ्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या डॉ.अनिर्बन बोस यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. डॉक्टर बनण्यापासून ते लेखक-दिग्दर्शकापर्यंतच्या या उल्लेखनीय प्रवासावर अनिर्बन म्हणाले की, "मी एक डॉक्टर असल्यानं रूग्णांची काळजी घेतो. तसेच मेडिकलच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. मला माझ्या कम्फर्ट झोनबाहेर काढून, आयुष्यातील दोन वर्षे या चित्रपट निर्मितीकरता समर्पित करण्यास प्रवृत्त करणाऱ्या या कथेतील सौंदर्य प्रेक्षकांना प्रेमात पाडल्याशिवाय राहणार नाही."
हेही वाचा :