नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील 'नो ड्रोन फ्लाय झोन'मध्ये दोन वेळा ड्रोनने घिरट्या घालण्याच्या प्रकारानंतर शोध घेऊनही ड्रोन किंवा ड्रोनचालक पोलिसांना सापडलेला नाही. अखेर शहर पोलिसांनी अधिसूचना काढून ड्रोनचालकांना त्यांच्याकडील ड्रोन जवळील पोलिस ठाण्यांमध्ये जमा करण्याच्या आदेशाला ड्रोनचालकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. सातपूर पोलिसांनी मंगळवारी (दि.4) एक ड्रोन जमा केल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यात लष्करी आस्थापना असल्याने ते अतिसंवेदनशील क्षेत्र आहेत. ड्रोनचा वापर करून जगभरात हल्ले करण्यात आल्यामुळे खबरदारी म्हणून शहरातील 16 ठिकाणी 'नो ड्रोन फ्लाय झोन' लागू आहेत. मात्र, महिनाभराच्या अंतराने कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूल (कॅट्स), तसेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) क्षेत्रात ड्रोनने घिरट्या घातल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमधील ड्रोन किंवा ड्रोनचालक न मिळून आल्याने ड्रोन उडवण्याचा त्यांचा उद्देशही अद्याप स्पष्ट झालेला नाही. दरम्यान, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी अधिसूचना काढून शहरातील ड्रोनचालकांना त्यांच्याकडील ड्रोन पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
ड्रोन पोलिसांच्या ताब्यात ठेवावे लागणार असून, ड्रोन वापरताना शुल्क भरण्यासोबतच पोलिस कर्मचारी सोबत न्यावा लागणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस ठाणेनिहाय बैठका सुरू आहेत. ड्रोनमालक आणि वापरकर्त्यांचा शोध घेत त्यांना मनाई आदेश दिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी छायाचित्रकारांसह ड्रोनचालक, मालकांचा शोध घेत त्यांची बैठक घेत त्यांना आदेशाबाबत सांगत त्यांच्याकडून ड्रोन जमा करण्यावर पोलिसांचा भर आहे.
ड्रोनचालकांना अनेक प्रश्न
आगामी दिवाळी आणि त्यानंतर सुरू होणारी लग्नसराई यामध्ये ड्रोनचा वापर करावा लागेल. चित्रीकरणाची ऑर्डर फक्त शहरापुरती मर्यादित नसून जिल्ह्याबाहेरही जावे लागते. त्यामुळे पोलिसांकडे ड्रोन जमा केल्यास अर्जफाटे, शुल्क व पोलिस कर्मचारी सोबत नेणे हे खर्चिक असल्याचे बोलले जाते. त्याचप्रमाणे पोलिसांच्या ताब्यात लाखो रुपयांचे ड्रोन सुरक्षित राहतील का? याची खात्री ड्रोनचालकांना सतावत आहे.