नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पूर, भूकंप, भूस्खलन अशा नैसर्गिक आपत्तींसह अपघात आणि मानवनिर्मित आपत्तींचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील 500 स्वयंसेवकांना 'आपदा मित्र'अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणाचा टप्पा पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थींना सुसज्ज असे किट देण्यात येणार आहे. जिल्ह्यासाठी केंद्रस्तरावरून 500 किट उपलब्ध झाले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून देशात नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींमध्ये वाढ झाली आहे. आपत्ती दरम्यान, वेळेत मदत न मिळाल्याने आपदग्रस्तांना जीव गमवावा लागतो, तर काहींना कायमचे अपंगत्व येते. मनुष्यहानीसह जनावरे तसेच मालमत्तांच्या नुकसानीलाही सामोरे जावे लागते. त्यामुळेच आपत्तीच्या या घटनांचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने (एनडीएमए) जिल्हास्तरावरच स्वयंसेवक तयार करण्याची 'आपदा मित्र' मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत स्वयंसेवकांना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण देताना त्यांना अशा घटनांच्या मुकाबल्यासाठी किटही देण्यात येणार आहे. आपदा मित्र मोहिमेंतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी 500 स्वयंसेवकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षणार्थींसाठी 18 ते 40 वर्षांच्या वयोगटाची मर्यादा तसेच किमान सातवी पास असणे आवश्यक आहे. एकूण प्रशिक्षणार्थींमधून 25 टक्के महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच माजी सैनिक, एनसीसी, भारत स्काउट-गाइड, सिव्हिल डिफेन्स, होमगार्ड, एनवायकेएस उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रशिक्षण घेणार्या 500 स्वयंसेवकांमुळे भविष्यात जिल्ह्यातील आपत्तीची हानी कमीत कमी होण्यास मदत होणार आहे.
कोल्हापूरमध्ये पायलट प्रकल्प
राज्यात सर्वप्रथम कोल्हापूरमध्ये आपदा मित्र मोहीम राबविण्यात आली. तेथील यशानंतर नाशिक, मुंबई उपनगर, पुणे, नागपूरसह एकूण 20 जिल्ह्यांमध्ये या मोहिमेंतर्गत सुमारे 7 हजार 900 स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागात संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
किटमध्ये 15 वस्तू
एनडीएमएने उपलब्ध करून दिलेल्या किटमध्ये विविध 15 वस्तूंचा समावेश आहे. त्यामध्ये लाइफ जॅकेट, सोलर बॅटरी, सेफ्टी ग्लोव्हज, पॉकेट चाकू, फस्टेड किट बॉक्स, गॅस लायटर, पाण्याची बाटली, शिटी, बॅग, मच्छरदाणी, हेल्मेट, टी-शर्ट, रेनकोट, गमबूट व गॉगल आदी साहित्यांचा समावेश आहे.