

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'आलंय माझ्या राशीला' चित्रपट चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील कलाकारांची दाद द्यावी तितकी कमीच. प्रेक्षकांची पसंती मिळवत आलेला हा चित्रपट 'आनंदी वास्तू' आणि 'साईकमल प्रोडक्शन' निर्मित आहे. या चित्रपटात अभिनेत्री धनश्री कदम मध्यवर्ती भूमिकेत आहे. विविध राशींच्या गंमतीजमती त्यांची वैशिष्ट्य आपल्याला चित्रपटातून जाणून घेता येत आहेत. धनश्रीने या चित्रपटात राधा हे पात्र साकारलं आहे.
प्रत्येक राशींच्या असलेल्या स्वभाव वैशिष्ट्यांवर हा चित्रपट भाष्य करतो. सौंदर्याची गंमत दाखविणारा, राशींच्या उत्सुकतेला अभ्यासाच्या आणि विज्ञानाच्या आधारे जोडणारा 'आलंय माझ्या राशीला' चित्रपटाचं दिग्दर्शन अजित शिरोळे यांनी केलं आहे.
अभिनेत्री धनश्री कदम सोबत या चित्रपटात अलका कुबल, मोहन जोशी, निर्मिती सावंत, प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, प्रणव पिंपळकर, मंगेश देसाई, उषा नाईक यांच्या दमदार भूमिका पाहायला मिळत आहेत.
एकूणच चित्रपटाबाबतचा अनुभव सांगत असताना धनश्री असे म्हणाली की, "'आलंय माझ्या राशीला' चित्रपटात काम करण्याची मिळालेली संधी माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे. या चित्रपटात मी राधा नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. ही भूमिका साकारणं माझ्यासाठी आव्हानात्मक होत. विलन असलेल्या या माझ्या भूमिकेला मी १००% न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात ऐतिहासिक चित्रपटात काम करायची इच्छा तिने दर्शवली आहे. निर्माते, दिग्दर्शक आणि आता मायबाप प्रेक्षक वर्गाकडून मिळालेली शाबासकी हिच माझ्या कामाची पोचपावती आहे."