पुढारी ऑनलाईन डेस्क : आईने मनात आणलं तर ती काय काय करु शकते याचं आदर्श उदाहरण म्हणजे आई कुठे काय करते ही मालिका. अरुंधतीचा संघर्ष अगदी जवळून पाहायला मिळाला आहे. अनेक संकटं आली तरी अरुंधती कधीही डगमगली नाही. तिने प्रत्येक संकटाचा जिद्दीने सामना केला. अरुंधतीच्या आयुष्यातील असाच एक महत्त्वाचा टप्पा आई कुठे काय करते मालिकेत सध्या सुरु आहे.
देशमुख कुटुंबाचा अविभाज्य भाग अर्थातच समृद्धी बंगल्यावर अनिरुद्ध आणि संजनाने हक्क दाखवला आहे. समृद्धी निवासाचा ताबा पुन्हा मिळवण्यासाठी अरुंधतीला पैश्यांची अत्यंत गरज होती. त्यामुळेच तिने महाराष्ट्राची सुगरण जोडी या स्पर्धेत मिहीर शर्मासोबत सहभाग घेतला. अनेक नवनवे पदार्थ तिने या स्पर्धेत करुन दाखवले. अनिरुद्ध आणि संजनासारखे प्रतिस्पर्धी असल्यावर विघ्न येणार हे काही नव्याने सांगायला नको.
अरुंधतीच्या वाटेत असंख्य अडथळे आणण्याचं काम अनिरुद्ध आणि संजनाने केले. मात्र हे अडथळे पार करत अखेर अरुंधती महाराष्ट्राची सुगरण जोडी ही स्पर्धा जिंकणार आहे. अंतिम फेरीत अरुंधती आणि मिहिरने मिळून फणसाचं सांदण, अळुचं फतफतं आणि केळफुलाची भाजी असे पारंपरिक पदार्थ बनवले आहेत.
आई कुठे काय करते दुपारी २.३० वाजता स्टार प्रवाहवर पाहता येईल.