‘स्पायडर मॅन : नो वे होम’ने मोडले अ‍ॅडव्हान्स बुकिंगचे सर्व विक्रम | पुढारी

‘स्पायडर मॅन : नो वे होम’ने मोडले अ‍ॅडव्हान्स बुकिंगचे सर्व विक्रम

पुढारी ऑनलाईन :  लॉकडाऊननंतर थिएटर्स सुरू झाल्यावर बॉक्स ऑफिसवर इतर कोणत्याही सिनेमाची टक्कर नसल्याने अक्षय कुमारच्‍या ‘सूर्यवंशी’ ला चांगला गल्ला कमावता आला. त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीला बूस्ट मिळाला असला, तरी त्यानंतर आलेले हिंदी चित्रपट फारशी चमक दाखवू शकले नाहीत. तथापि, हॉलीवूडच्या बहुप्रतीक्षित ‘स्पायडर मॅन : नो वे होम’ ने या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगने मात्र बॉक्स ऑफिसवर त्सुनामी आणण्याची तयारी केली आहे. भारतात हा चित्रपट 16 डिसेंबर, तर जगभरात 17 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.

‘पीव्हीआर’ने अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशी एक लाख तिकिटांची विक्री केली. तर ‘आयनॉक्स’ने 24 तासांत दीड लाख तिकिटे विकली. हा चित्रपट भारतात हिंदीसह इंग्रजी, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड भाषांतही रिलीज होत आहे. जॉन वॉटस् दिग्दर्शित या चित्रपटात टॉम हॉलँड, झेंडाया, बेनेडिक्ट कम्बरबॅच यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

दिल्लीत एका बड्या थिएटर चेनच्या 3-डी शोच्या सकाळच्या एका तिकिटाची किंमत 900 रुपये, दुपारच्या शोची 1,300 रुपये आणि संध्याकाळच्या शोची एका तिकिटाची किंमत 1,600 रुपये आहे. मुंबईतही एका बड्या थिएटर फ्रँचायजीत एका तिकिटाची किंमत 2,700 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. अनेक थिएटर्समध्ये 24 तास शोज चालणार आहेत. पहिला शो 16 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजता असणार आहे.

या चित्रपटाला एवढा प्रतिसाद मिळण्याची अनेक कारणे आहेत. एक तर मार्व्हल स्टुडिओज आणि मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा जगभरात स्वतःचा असा एक मोठा फॅनबेस गेल्या 10-11 वर्षांत तयार झाला आहे. या फॅन्सना मार्व्हलच्या सिनेमांची प्रतीक्षा असते.

दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, स्पायडर मॅन फ्रँचायजीतील आतापर्यंतचे सर्व व्हीलन ग्रीन गॉब्लिन, डॉ. ऑक्टोपस, सँड मॅन, इलेक्ट्रो, लिझार्ड यात आहेत. तसेच आतापर्यंत टॉबी मॅगवायर, अँड्र्यू गारफिल्ड आणि सध्याचा टॉम हॉलंड या अभिनेत्यांनी स्पायडर मॅन तथा पीटर पार्कर हे कॅरेक्टर साकारले आहे. हे तिन्ही स्पायडर मॅन या चित्रपटात एकत्र दिसणार असल्याची चर्चा गेल्या काही काळापासून आहे. त्यामुळे तिन्ही स्पायडर मॅन एकत्रित पाहायला मिळणार, अशी एक हाईप या चित्रपटाबाबत तयार झाली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button