कराड : मलकापूर येथे एकावर धारदार शस्त्राने वार, भरदिवसा झालेल्या घटनेने तणाव | पुढारी

कराड : मलकापूर येथे एकावर धारदार शस्त्राने वार, भरदिवसा झालेल्या घटनेने तणाव

कराड : पुढारी वृत्तसेवा

लहान मुलांमध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चार ते पाच जणांनी एकावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. बुधवारी (दि.15) सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास मलकापूर फाटा तालुका कराड येथे ही घटना घडली. भरदिवसा व शहरातील मुख्य चौकात घडलेल्या या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.

विश्वास येडगे (वय 29, रा. मलकापूर) असे हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, लहान मुलांमध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून बुधवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास चार ते पाच जणांनी विश्वास येडगे यांच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्राने विश्वास येडगे यांच्या पोटावर व शरीरावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्यामध्ये विश्वास येडगे मलकापूर फाटा येथे भररस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

दरम्यान या घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी जखमी विश्वास येडगे यांना उपचारासाठी त्वरित रुग्णालयात हलवले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक डॉ. रणजीत पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.

Back to top button