शेवंता : ‘सहकलाकारांनी वजनावरून खिल्ली उडवल्याने मालिका सोडली’

शेवंता : ‘सहकलाकारांनी वजनावरून खिल्ली उडवल्याने मालिका सोडली’
शेवंता : ‘सहकलाकारांनी वजनावरून खिल्ली उडवल्याने मालिका सोडली’
Published on
Updated on

झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले' मालिकेच्या तिस-या पर्वातून (रात्रीस खेळ चाले ३) शेवंता उर्फ अपुर्वा नेमळेकर बाहेर पडणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाला आहे. स्वत: अपुर्वा हिने याबाबत मोठा खुलासा केला आहे. मालिका का सोडणार आहे याबाबत तिने तीन पानी पत्र लिहून आपल्या चाहत्यांसाठी एकप्रकारे आपबीतीच कथन केली आहे. 'रात्रीस खेळ चाले'मध्ये यापुढे शेवंता दिसणार नाही हे कन्फर्म झाल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे समजते आहे. सोशल मीडियावर अनेकांनी अपुर्वाच्या जाण्यावरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रात्रीस खेळ चाले ही मालिका पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. त्यातील शेवंताच्या भूमिकेने तर अनेकांनावर भूरळ घालली. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने शेवंताची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अपुर्वा तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. तिसऱ्या भागातही शेवंता चर्चेत राहिली आहे. शेवंताच्या भूमिकेसाठी अपुर्वाने १२ किलो वजन वाढवले. पण दुर्दैवाने हेच वजन तिला मालिका सोडण्याचे कारण ठरले आहे. वाढलेल्या वजनामुळे तिला सहकलाकारांकडून कसे टोमणे खावे लागायचे, त्याला कंटाळून मी कशी मालिका सोडत आहे, या सर्व त्रासाबाबत तिने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तीन पानी पत्र लिहून प्रेक्षकांना कळवले आहे.

शेवंता उर्फ अपुर्वा नेमळेकर काय म्हणते इन्स्टाग्राम पोस्टमध्ये…

"शेवंता" बस नाम ही काफी हैं, पर कभी कभी ये इतनाहीं काफी नहीं होता.

"शेवंता म्हणून, आपली एक ओळख आणि नंतर ते जिव्हाळ्याचे नाते या एका साध्या अपूर्वाशी जोडले गेले. एक अभिनेत्री म्हणून मला हि भूमिका करताना खूप मजा आली आणि समाधानही वाटले. खरं सांगायचं तर "शेवंता चे सादरीकरण हे मला सहज जमत गेले, जणू काही मीच ती शेवंता अशी एक चेतना, आजवर मी जगत आले. त्या भूमिके मधले नाविन्य, त्या व्यक्ती रेखेतील विविध पैलू, निरनिराळ्या छटा यामुळे प्रेक्षकां मध्ये "शेवंता" हि अजरामर झाली. शेवंताची भूमिका मला खूप काही देऊन गेली.

असे सर्व काही छान घडत असताना, आपल्या सर्वांच्या मनात एकच उत्सुकता असेल, की मी "शेवंता" च्या भूमिकेचा का त्याग केला. असे काय घडले ज्याने मला हा प्रतिकूल निर्णय घ्यावा लागला? मला माझ्या सोशल मीडियावर कर्मेटमार्फत, ईमेल्स मधून प्रेक्षकांनी या बद्दल विचारना केली. त्यांच उत्तर देणं हीं माझी वैयक्तिक जबाबदारी आहे. आणि या गोष्टीचा उलगडा करणे हें माझं कर्तव्य समजून याचा खुलासा करीत आहे.

शेवंता या भूमिकेसाठी मी 10 किलो वजन वाढवलं होतं. वजन वाढल्यावर ज्या काही निगेटिव्ह कॉमेंट, आल्या त्याला मी फेस करत आले. परंतु आता सेटवर काम करत असताना अगदीच नवख्या आणि काही जेष्ठ कलाकारांनी विनाकारण या वाढलेल्या वजनावर माझे विडंबण केले. उघडपणे माझी खिल्ली उडवली गेली. त्यात काही कमेंट्स तर मला जिव्हारी लागतील अश्या जाणीवपूर्वक वारंवार केले गेल्या. त्याबद्दल वरिष्ठानी त्यावर कारवाई केल्यानंतरहीं, संबंधित नवख्या कलाकारांनी साधी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही.

तुम्हाला माहितीच आहे की RKC चं शूटिंग हे सावंतवाडीत चालु . आहे. मी मुंबईवरून 12 तासाचा ट्रेन नं प्रवास करुन जात होते. मला शूटिंग करता बोलावल्यानंतर फक्त एकच दिवस शूट करुन नंतर 3-4 दिवस काहीच शूट केल जात नव्हतं. असं महिन्याभरात केवळ 6 ते 7 दिवसच काम लागत होतं. आणि त्याकरिता मला • वारंवार प्रवास करावा लागत होता. त्यात माझा अमूल्य वेळ संपूर्ण महिनाभर वाया जात होता.

production हाऊस कडून मला सांगण्यात आलं होतं की तिसऱ्यां सीजन साठी तुमचे आम्हाला 5 ते 6 दिवसच लागणार आहेत म्हणून तेव्हा मी नकार दिल्यानंतर चॅनेल कडून मला आणखी एक शो देण्याच आश्वासन दिलं गेल. परंतु 5 ते 6 महिने झाले अध्याप ते आश्वासन पाळलं गेलं नाही. त्यामुळे माझं आर्थिक नुकसान होत आहे.

असाच प्रकार गेल्या वर्षी सुद्धा झी युवा वरील 'तुझं माझं जमतंय या मालिकेच्या वेळी घडला. त्या मालिकेचा शेवटचा चेक मिळाला नाही म्हणून त्याबाबत सुद्धा चॅनेल कडून एकही पैसा बुडणार नाही. असं आश्वासन दिलं गेलं होतं. अध्याप पर्यत तो चेक मिळाला नाही आणि ते सुद्धा आश्वासन पाळलं गेलं नाही.

मी अत्यंत प्रामाणिकपणे चॅनेलशी एकनिष्ठ राहून काम केलं. परंतु माझ्या कष्टाचा मोबदला मला मिळतं नसेल. आणि माझ्या प्रामाणिक कष्टाची, अवहेलना जिथं होतं असेल.. आणि नवख्या कलाकाराकडून अपमास्पद वागणूक मिळतं असेल अशा ठिकाणी काम करणं माझ्या तत्वात बसत नाही. त्यामुळे मी या शो मध्ये नं राहण्याचा निर्णय घेतला.

या सर्व पार्श्वभूमीवर माझ्या जिव्हाळ्याच्या शेवंता तून मला बाहेर पडावे लागले दुर्दैव आहे परंतु हा सर्वस्वी माझा वैयत्तिक निर्णय आहे. आयुष इथेच थांबले नाही, आणखीन काही नवीन रोल्स, मी करत राहीन. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच सदैव होत राहील अशी मी आशा करते. हीच माझी एकमेव प्रेरणा आहे.

अपूर्वा नेमळेकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news