Shilpa Shetty & Raj Kundra : अभिनेत्री शिल्‍पा शेट्‍टी, राज कुंद्राच्‍या अडचणीत पुन्‍हा वाढ | पुढारी

Shilpa Shetty & Raj Kundra : अभिनेत्री शिल्‍पा शेट्‍टी, राज कुंद्राच्‍या अडचणीत पुन्‍हा वाढ

मुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलीवूड अभिनेत्री शिल्‍पा शेट्‍टी आणि तिचा पती राज कुंद्रा ( Shilpa Shetty & Raj Kundra ) यांच्‍या अडचणीत पुन्‍हा एकदा वाढ झाली आहे. यापूर्वीच राज कुंद्राविरोधात पॉर्न व्‍हिडिओप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरु असतानाच  शिल्‍पा शेट्‍टी आणि राज कुंद्रा
( Shilpa Shetty & Raj Kundra ) यांच्‍याविरोधात मुंबईतील बांद्रा पोलिस ठाण्‍यात आर्थिक फसवणुकीचा गुन्‍हा दाखल झाला आहे.

मीडिया रिर्पाटनुसार, या प्रकरणी व्‍यावसायिक नितीन बराई यांनी तक्रार दिली असून, २०१४ पासून आर्थिक फसवणूक झाल्‍याचे त्‍यांनी म्‍हटलं आहे. शिल्‍पा शेट्‍टी, राज कुंद्रा आणि अन्‍य आरोपींवर ४०६, ४०९, ४२०, ५०६, ३४ आणि १२० (ब) कलमान्‍वये गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. पोलिस लवकरच या प्रकरणातील संशयित शिल्‍पा शेट्‍टी आणि राज कुंद्रा यांची चाैकशी करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

( Shilpa Shetty & Raj Kundra ) १ कोटी ५९ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक

बराई यांनी आपल्‍या तक्रारीत म्‍हटलं आहे की, शिल्‍पा शेट्‍टी आणि राज कुंद्रा यांना स्‍पा आणि जिम सेंटरची शाखा पुणे येथील कोरेगाव येथे सुरु करायची होती. यासाठी त्‍यांनी माझ्‍याशी संपर्क केला. या व्‍यवसायात मोठा फायदा असल्‍याचे मला सांगितले. यावर विश्‍वास ठेवून मी १ कोटी ५९ लाख २७ हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र या पैशाचा वापर व्‍यवसायाऐवजी संशयित आरोपींनी स्‍वत:च्‍या फायदयासाठी केला. तसेच पैसे परत देण्‍याची मागणी केल्‍यानंतर धमकीही दिल्‍याचेही त्‍यांनी तक्रारीत म्‍हटलं आहे.

अश्‍लील चित्रपट निर्मिती प्रकरणी ७ जुलै रोजी शिल्‍पा शेट्‍टीचा पती राज कुंद्रा याला अटक करण्‍यात आली होती. तब्‍बल दोन महिने कारागृहात मुक्‍काम केल्‍यानंतर त्‍याला जामीन मिळाली. यानंतर राज कुंद्रा याने आपले ट्‍विटर आणि इंस्‍ट्राग्राम अकाउंट डिलिट केले आहे. पॉर्न व्‍हिडिओ प्रकरणात गुन्‍हा दाखल होण्‍यापूर्वी तो सोशल मीडियावर खूपच सक्रीय होता. सध्‍या शिल्‍पा शेट्‍टी ही आपल्‍या कुटुंबासमवेत हिमाचल प्रदेशमध्‍ये आहे. तिने पती राज कुंद्रासमवेत धर्मशालामधील बगलामुखी मंदिरालाही नुकतीच भेट दिली होती.

हेही वाचलं का?

Back to top button