जेफ बेजोस म्हणाले, भविष्यात सुट्टीसाठी पृथ्वीवर येईल माणूस | पुढारी

जेफ बेजोस म्हणाले, भविष्यात सुट्टीसाठी पृथ्वीवर येईल माणूस

वॉशिंग्टन : ‘अ‍ॅमेझॉन’ आणि ‘ब्लू ओरिजिन’सारख्या कंपन्यांचे संस्थापक जेफ बेजोस यांनी भविष्यातील अंतराळ क्षेत्राबाबत एक भाकीत केले आहे. बेजोस यांनी म्हटले आहे की भविष्यात अंतराळातच नवी शहरे वसवली जातील. अंतराळात तरंगणार्‍या घरांमध्ये माणसांचा जन्म होईल आणि सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हे लोक पृथ्वीवर येतील!

वॉशिंग्टनमधील ‘ब्लू ओरिजिन’ कंपनीच्या भविष्याबाबत आयोजित केलेल्या चर्चासत्रात जेफ बेजोस यांनी हे भाकीत केले आहे. त्यांनी म्हटले आहे की अंतराळात जन्मलेला माणूस अशा पद्धतीने पृथ्वीवर सुट्टी घालवण्यासाठी येईल ज्याप्रमाणे आपण एखाद्या पर्यटनस्थळी किंवा पार्कमध्ये जातो. अंतराळातील घरे ही एक प्रकारची तरंगती घरेच असतील.

माणसांना अशा ठिकाणी राहण्यासाठी पृथ्वीवरील हवामान आणि गुरुत्वाकर्षण यांची नक्कल किंवा प्रतिकृती बनवली जाईल. या तरंगत्या घरांमध्ये दहा लाख लोक राहू शकतील आणि अशा घरांच्या गावात नदी, जंगले व वन्यजीवही असतील. अनेक शतके अशा अंतराळातील घरांमध्ये लोक जन्मतील आणि तेच त्यांचे पहिले घर असेल. सध्या अनेक लोक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी यलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये जातात, त्याचप्रमाणे अंतराळात राहणारे लोक पृथ्वीवर येतील.

एखाद्या दुसर्‍या ग्रहावर जाऊन मानवी वसाहत स्थापन करण्यापेक्षा अंतराळातच मानवी वसाहत स्थापन करणे अधिक चांगले आहे. ‘टेस्ला’ आणि ‘स्पेस एक्स’ या कंपन्यांचे प्रमुख एलन मस्क यांनी मंगळावर मानवी वसाहत स्थापन करण्याचे स्वप्न पाहिलेले आहे हे याठिकाणी उल्लेखनीय आहे. मस्क आणि बेजोस यांच्यामधील स्पर्धाही अनेक वर्षांपासून जग पाहत आले आहे.

Back to top button