मिलिंद तेलतुंबडे : पोलिसांनी तब्बल ५० लाखांचे बक्षीस ठेवलेला मिलिंद तेलतुंबडे होता तरी कोण ? | पुढारी

मिलिंद तेलतुंबडे : पोलिसांनी तब्बल ५० लाखांचे बक्षीस ठेवलेला मिलिंद तेलतुंबडे होता तरी कोण ?

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील गॅरापत्ती पोलिस मदत केंद्रांतर्गत बोटेझरी-मरदिनटोला परिसरातील जंगलात पोलिस-नक्षल चकमक झाली. यात २६ नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीत ३ पोलिस किरकोळ जखमी झाले. या चकमकीत नक्षलवाद्यांचा देशातील सर्वात मोठा नेता मिलिंद तेलतुंबडेचाही खात्मा झाला आहे.

नक्षलवाद्याच्या मोठ्या कंमाडर पैकी एक म्हणून मिलिंद तेलतुंबडे याची ओळख होती. त्याच्यावर ५० लाखांच बक्षीस लावलं गेलं होत. या चकमकीत नक्षल्यांचे जहाल नेते मिलिंद तेलतुंबडे मारला गेला आहे. पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे.

सी-६० पथक व केंद्रीय राखीव दलाचे जवान संयुक्तपणे छत्तीसगड सीमावर्ती भागातील बोटेझरी जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना साडेपाच वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही जोरदार प्रत्युतर दिले. त्यानंतर नक्षलवादी घटनास्थळावरुन पसार झाले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नक्षल्यांचे पिट्टू, शस्त्रे व अन्य साहित्य सापडले आहे.

मिलिंद तेलतुंबडे आहे तरी कोण?

मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील राजूर येथील रहिवासी असलेला मिलिंद तेलतुंबडे हा सह्याद्री, दीपक इत्यादी टोपणनावांनी नक्षल चळवळीत ओळखला जात होता. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला मिलिंद तेलतुंबडे हा मागील ३० वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रिय होता. प्रतिबंधित माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा राज्य सचिवही होता. त्याच्यावर राज्य पोलिसांनी ५० लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

तीन-चार वर्षांपूवी महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड (एमएमसी) झोन स्थापन करण्यात मिलिंदने महत्वाची भूमिका पार पाडली. या झोनचा तो सर्वोच्च नेता होता. चालू आठवड्यात राज्याचे आपत्ती निवारण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात सुरजागड खाणी विरोधातील आंदोलनासंदर्भात टीका करणारे एक पत्र जारी झाले होते. त्यावर नक्षल्यांच्या दक्षिण झोनचा प्रवक्ता श्रीनिवास याची स्वाक्षरी होती. मात्र, पत्रातील भाषेवरुन ते पत्र सह्याद्री यानेच लिहिल्याचे स्पष्ट झाले होते.

हे ही वाचलं का?

Back to top button