भरजरी वेशभूषेनं सजणार जोगेश्वरी देवी- भैरवनाथाचा विवाह सोहळा | पुढारी

भरजरी वेशभूषेनं सजणार जोगेश्वरी देवी- भैरवनाथाचा विवाह सोहळा

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेमारू मराठीबाणा वाहिनीवरील ‘जोगेश्वरीचा पती भैरवनाथ’ ही मालिका सध्या प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. आजवर कोणत्याच माध्यमातून प्रेक्षकांनी न बघितलेली आपल्या पुजनीय ग्रामदेवतेची ही गोष्ट सर्वच स्तरातील प्रेक्षकांना आवडत आहे. अनेक उत्कंठावर्धक वळणांनंतर ही मालिका आता एका महत्त्वाच्या टप्यावर आली आहे. हा टप्पा म्हणजे, जोगेश्वरी आणि भैरवनाथाच्या विवाहाचा. येत्या २५ ते २८ सप्टेंबरच्या भागांमध्ये हा अलौकिक विवाह सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रत्यक्ष देवी -देवता लग्न बंधनात अडकत असल्याने या सोहळ्याची तयारीही त्याच भव्य-दिव्य प्रकारची असणार आहे. यातही विशेष असणार आहे या दोघांची वेशभूषा.

संबधित बातम्या 

लग्नसोहळ्यासाठी दोघांसाठी खास आणि आकर्षक अशा रंगसंगतीचे कपडे तयार करण्यात आले आहेत. महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृतीचा मिलाफ असलेल्या विविध गोष्टी या लग्न सोहळ्यामध्ये बघायला मिळणार आहेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातील शालू या वस्त्रप्रकाराशिवाय कोणतंही मराठी लग्न पूर्णच होत नाही. हा शालू नववधूसाठीचा एक अनमोल ठेवा असतो. जोगेश्वरी देवीच्या भूमिकेतील क्षमा देशपांडे अशाच एका खास गुलाबी आणि हिरव्या रंगातल्या शालूमध्ये सजणार आहे. या भरजरी शालूमधून तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसणार आहे.

तर भैरवनाथांची भूमिका साकारणारा अभिनेता प्रतीक निकम कोटा साडीपासून बनवलेल्या धोतीमध्ये, खांद्यावरील गुलाबी रंगाची शाल आणि डोक्यावरील फेट्यामुळे अधिकच रुबाबदार दिसणार आहे. याशिवाय दोघांच्याही अंगावर पारंपरीक पध्दतीने तयार केलेले दागिनेही बघायला मिळणार आहेत.

एकंदरीत जोगेश्वरी देवी आणि भैरवनाथाच्या आयुष्यातील हा खास प्रसंग या वेशभूषेमुळे आणखी विशेष बनणार आहे. याशिवाय या लग्नाच्या कथानकामध्ये अनेक रंजक गोष्टीही घडणार आहेत. यामुळे मालिकेत पुढे काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button