तुझेच मी गीत गात आहे : ‘राणा दा’ हार्दिक जोशीची होणार एन्ट्री | पुढारी

तुझेच मी गीत गात आहे : 'राणा दा' हार्दिक जोशीची होणार एन्ट्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आहे. एकीकडे स्वराजच आपला मुलगा आहे हे सत्य मल्हारसमोर उलगडेल का याची उत्सुकता असताना आता मालिकेत एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. शुभंकर ठाकूर असं या नव्या पात्राचं नाव असून त्याचं मोनिकासोबत खास नातं आहे. हे नातं नेमकं काय असेल हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल. मात्र शुभंकरच्या एन्ट्रीने मालिकेत धमाकेदार वळण येणार हे मात्र नक्की. प्रसिद्ध अभिनेता राणा दा अर्थातच हार्दिक जोशी शुभंकरची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

या नव्या भूमिकेबद्दल सांगताना हार्दिक जोशी म्हणाला, ‘स्टार प्रवाह वाहिनीसोबत माझं जुनं नातं आहे. लक्ष्य, पुढचं पाऊल आणि दुर्वा या मालिकांमध्ये मी छोट्या छोट्या भूमिका साकारल्या होत्या. जवळपास ८ वर्षांनी पुन्हा एकदा या लाडक्या वाहिनीसोबत काम करण्याचा योग जुळून आला आहे. एखादं नवं पात्र जेव्हा मालिकेत येतं तेव्हा ते नवी गोष्ट घेऊन येतं. ते पात्र ती गोष्ट रंगवत असतं. शुभंकरच्या येण्याने मालिकेत नवं नाट्य रंगेल. परदेशी असलेला शुभंकर बिझनेसच्या निमित्ताने भारतात आला आहे. शुभंकर स्पष्टवक्ता असला तरी मनाने अतिशय हळवा आहे. त्याला इतरांनी केलेली मदत तो कधीच विसरत नाही. शुभंकरचं कामत कुटुंब आणि मोनिकासोबत नेमकं काय कनेक्शन आहे हे लवकरच उलगडेल.

Back to top button