रहस्याचा शोध घेणारा ‘अदृश्य’ चित्रपटाचा ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’ | पुढारी

रहस्याचा शोध घेणारा ‘अदृश्य’ चित्रपटाचा ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘हत्या की आत्महत्या’ याचे रहस्य उलगडणारा कबीर लाल दिग्दर्शित ’अदृश्य’ हा नवा चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. मंजिरी फडणीस, पुष्कर जोग, सौरभ गोखले, उषा नाडकर्णी, अनंत जोग आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाची पत्रकार परिषद मुंबई येथे झाली.

“अदृश्य” हा चित्रपट प्रोग्रेसिव्ह ब्लाइंडनेसने आजारी असणाऱ्या दोन जुळ्या बहिणी सायली आणि सानिका भोवती फिरतो. सायलीची जुळी बहिण असणारी सानिका बहिणीच्या रहस्यमय मृत्यूमागील सत्य उघड करण्याचा प्रयत्न करत असते, पण सानिकाला बऱ्याच विकृत वास्तवाचा सामना करावा लागतो. सायलीचा मृत्यूही, ‘हत्या की आत्महत्या’ हा प्रश्न तिला शांत बसू देतं नाही. या शोधमोहिमेत अदृश्य ‘व्यक्ती’ की अदृश्य ‘उत्तर’ हा प्रश्न एका रोमांचक वळणावर घेऊन जातो.

मला नेहमीच सर्व भाषांमध्ये चित्रपट करायचे होते आणि अदृश्यच्या निमित्ताने मला ती संधी मिळाली, याचा मला अभिमान वाटतो, असे चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर लाल यांनी सांगितले. सहकलाकार, उत्तम ठिकाण आणि उत्तम दिग्दर्शकाने बनलेला हा चित्रपट सुंदर झाला आहे, असे अभिनेत्री मंजिरी फडणीसने सांगितले.

मला खूप आनंद होत आहे की, मराठीत ओटीटी प्लॅाटफॅार्मवर माझा चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या चांगला झाला आहे, असे अभिनेता पुष्कर जोग यांनी सांगितले.

Back to top button