ओम आणि मोनालिसा उलगडणार रावरंभाची प्रेमकहाणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : इतिहासातील अनेक प्रेमकथा आपल्याला परिचित आहेत. इतिहासाच्या पानांमध्ये दडलेली अशीच एक अनोखी प्रेमकथा मराठी रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘मुळशी पॅटर्न’मधून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता ओम भूतकर आणि सौंदर्यासोबत अभिनयाचा सुरेख मिलाफ असलेली गुणी अभिनेत्री मोनालिसा बागल ‘रावरंभा’ चित्रपटातून जोडीच्या रूपाने समोर येणार आहेत. येत्या १२ मे ला इतिहासातील हे ‘मोरपंखी पान’ पडद्यावर रसिकांसमोर उलगडणार आहे. निर्माते निर्माते-शशिकांत शीला भाऊसाहेब पवार आणि दिग्दर्शक अनुप जगदाळे ही प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर आणणार आहेत.
आसमंतात फडकणाऱ्या भगव्या झेंड्याच्या पार्श्वभूमीवर एकमेंकांसोबत दिसणारे ‘राव’ आणि ‘रंभा’, त्यासोबत बेभान होऊन दौडणारे घोडेस्वार दिसताहेत. या आकर्षक पोस्टर मध्ये ओम आणि मोनालिसा यांची छान जुळून आलेली केमिस्ट्री पहायला मिळतेय. इतिहासाच्या पानांमध्ये ‘रावरंभा’ ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक दुर्लक्षित पण अनोखी प्रेमकहाणी दडली आहे. ही प्रेमकथा नुसतीच प्रेमकथा नाही तर तिला वास्तवाचे भरजरी कोंदण आहे. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्याप्रती आणि स्वराज्याच्या प्रती असलेली निष्ठा, शौर्याची, त्यागाची आणि समर्पणाची किनार या कथेला असल्याचे दिग्दर्शक अनुप जगदाळे सांगतात. चित्रपटात छत्रपतींच्या भूमिकेत शंतनू मोघे तर प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत अशोक समर्थ दिसणार आहेत.

शशिकांत पवार प्रोडक्शन अंतर्गत येणाऱ्या ‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. छायांकन संजय जाधव तर संकलन फैजल महाडिक यांचे आहे. सहनिर्माते अजित भोसले आणि संजय जगदाळे आहेत तर कार्यकारी निर्माते महेश भारांबे, अन्वय नायकोडी आहेत. गुरु ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेल्या गीतांना अमितराज यांनी संगीत दिले आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे आहे. वेशभूषा पौर्णिमा ओक, रंगभूषा प्रताप बोऱ्हाडे, कलादिग्दर्शन वासू पाटील यांचे आहे. साहसदृश्ये शेवोलिन मलेश यांची आहेत.
- ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील राम चरण आणि उपासना यांचे लक्षवेधी फोटो
- कोल्हापूर : तळाशीच्या हॉटेल व्यावसायिकाचा अपघाती मृत्यू
- मुलीनेच केला आईचा खून, लालबागमधील ‘त्या’ निर्घृण खूनाचे गूढ उलगडले