कोल्हापूर : तळाशीच्या हॉटेल व्यावसायिकाचा अपघाती मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : तळाशीच्या हॉटेल व्यावसायिकाचा अपघाती मृत्यू

कसबा वाळवे; पुढारी वृत्तसेवा : हॉटेलमधील कचरा टाकण्यासाठी गेलेल्या एका व्यावसायािकाचा दुचाकीवरून जात असताना लाकडाचे ओंडके भरुन थांबलेल्या ट्रॉलीला धडकल्याने हॉटेल व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.तळाशी पाटी(ता.राधानगरी) येथील वाकेश्वर हॉटेलचे मालक प्रकाश दादू सावरतकर (वय ५०)असे त्या हॉटेल मालकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री ११:३० च्या सुमारास कोल्हापूर – गारगोटी राज्यमार्गावरील तळाशी पाटी ते चंद्रेपाटी दरम्यान घडली.

तळाशी (ता.राधानगरी) येथील प्रकाश दादू सावरतकर हे २०१० पासून तळाशीपाटी येथे वाकेश्वर हॉटेल आणि नाष्टा सेंटर चालवतात. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ते हॉटेलमधील काम उरकून साचलेला कचरा टाकण्यासाठी दुचाकीवरून तळाशी पाटीकडून माजगावच्या ओढ्याकडे गेले होते. चंद्रेपाटी जवळ लाकडाने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीचा अँगल तुटल्याने बंद अवस्थेत रस्त्याच्या बाजूला लावला होता.कचरा टाकून परत येणाऱ्या सावरतकराना रात्रीच्या अंधारात लाईट इफेक्टमुळे ट्रॉलीचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी या थांबलेल्या ट्रॉलीला थडकली. यामध्ये सावरतकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले. अपघात इतका भीषण होता की सावरतकर गतप्राण होऊनही दुचाकी लाकडामध्ये उभीच होती. सावरतकर हे वयाच्या तेराव्या वर्षापासून हॉटेल व्यवसायामध्ये कार्यरत होते.मनमिळाऊ स्वभाव आणि ग्राहकांशी मित्रत्वाचे नाते जपणाऱ्या सावरतकर यांच्या असे अचानक जाण्याने त्यांच्या मित्र परिवारासह तळाशी पंचक्रोशीवर शोककाळा पसरली आहे.त्यांना दोन मुले असून एक मुलगा हा त्यांना हॉटेल कामात मदत करतो तर दुसरा आयटी कंपनीत इंजिनिअर पदावर कार्यरत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, आई, सुन असा परिवार आहे.कोल्हापूर येथील शासकीय दवाखान्यात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बुधवारी पहाटे त्यांच्यावर तळाशी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Back to top button