२४ फेब्रुवारीला रिलीज होणार सामाजिक चित्रपट 'मसुटा' | पुढारी

२४ फेब्रुवारीला रिलीज होणार सामाजिक चित्रपट 'मसुटा'

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘मसुटा’ हे मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट २४ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्रात रिलीज होणार आहे. या चित्रपटाद्वारे मराठी रसिकांसमोर एक आगळी वेगळी कथा येणार आहे. काशिबाई फिल्म्स प्रोडक्शन आणि साईसागर प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘मसुटा’ या चित्रपटाची निर्मिती भरत मोरे आणि मनेश लोढा यांनी केली आहे. अजित देवळे आणि सुनील शिंदे या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्युसर्स आहेत. अजित देवळे यांनीच ‘मसुटा’चं दिग्दर्शन आणि संकलनही केलं आहे.
‘मसुटा’ हा चित्रपट म्हणजे जगण्यासाठी धडपड करणारी जगावेगळी कर्मकहाणी आहे. यात समाजातील एका विशिष्ट वर्गातील मनाला भिडणारी कथा पहायला मिळेल. या चित्रपटाच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेशही देण्यात आले आहेत.

याबाबत दिग्दर्शक देवळे म्हणाले की, ‘मसुटा’ हा जरी एका विशिष्ट वर्गातील कुटुंबाची कथा सांगणारा असला तरी परिपूर्ण मनोरंजक चित्रपट आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये, प्रासंगिक गीतरचना आणि सुमधूर संगीताची किनार याला जोडण्यात आली आहे. मराठीसह हिंदीतही वावरणाऱ्या आघाडीच्या कलाकारांसह इतर कलावंतांनी हृदयस्पर्शी अभिनय केला आहे.

पटकथा लेखक भरत मोरे म्हणाले, मी वास्तविक लेखन करत असताना अनेक स्मशानात गेलो, म्हसणजोगी कुटूंबाची कर्मकहानी त्यांच्याच मुखातून समजावून घेतली. या आधुनिक जगापुढे आपल्या पारंपरिक व्यवसायामुळे आजही या म्हसणजोगी समाजाला किती यातना सहन कराव्या लागतात. या इतर शिक्षित समाजाला सांगण्याचा काहीसा धाडसी प्रयत्न लिखाणातून केला आहे. समस्त जगभरातील मानवजातीला देहदानाचा संदेश या चित्रपटाच्या अति मनोरंजक कथानकातून करून देणार आहे.

‘मसुटा’चं पटकथा लेखन भरत मोरे यांनी केलं आहे. अनिल राऊत यांनी संवाद लिहिले आहेत. अनंत जोग, नागेश भोसले, हृदयनाथ राणे, रियाझ मुलाणी, अर्चना महादेव, वैशाली केंडाळे, कांचन पगारे, यश मोरे आदी कलाकारांनी या चित्रपटात अभिनय केला आहे. गीतरचना आणि संगीत अविनाश पाटील व सुनील म्हात्रे यांचं आहे. आदर्श शिंदे, अबोली गिऱ्हे, अविनाश पाटील यांनी या चित्रपटासाठी गायन केलं आहे. कॅास्च्युम डिझाईन चैत्राली डोंगरे यांनी केलं आहे.

Back to top button