

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – काश्मीरमधील हिंदुंच्या पलायनावर आधारित 'दि काश्मीर फाईल्स' हा चित्रपट असभ्य आणि प्रचारकी (The Kashmir Files) असल्याचे नदाव लॅपिड यांनी म्हटले होते. इफ्फी चित्रपट महोत्सवाच्या परिक्षण मंडळाचे प्रमुख आणि इस्त्राईलचे चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांच्या चौफेर टीका होत आहे. इस्त्राईलचे भारतातील राजदूत नाओर गिलान यांनीदेखील लॅपिड यांचे वाभाडे काढले असून त्यांच्या देशाच्या वतीने भारतीयांची माफी मागितली आहे. (The Kashmir Files)
दरम्यान 'द काश्मीर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि चित्रपटात प्रमुख भूमिका असलेल्या अभिनेते अनुपम खेर यांनी गिलान यांच्यावर सडेतोड टीका केली आहे. गोवा येथे इफ्फी चित्रपट महोत्सवाचा सोमवारी समारोप झाला. त्यावेळी परिक्षण मंडळाचे प्रमुख नादेव लॅपिड यांनी 'दि काश्मीर फाईल्स' च्या अनुषंगाने वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांचे हे वक्तव्य त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लॅपिड यांचे वाभाडे काढताना इस्त्राईली राजदूत गिलान म्हणतात की, हिब्रू भाषेत आपण हे पत्र लिहिले नसून ते इंग्रजीत लिहिले आहे. कारण आपल्या भावना तमाम भारतीयांना समजाव्यात, असा त्यामागचा उद्देश आहे. गिलान यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल लाज वाटली पाहिजे. भारतीय संस्कृतीमध्ये पाहुण्याला देव समजले जाते आणि तुम्ही इफ्फी पॅनेलचे प्रमुख बनून येथे येऊन भारतीय आमंत्रणाचा अपमान केला आहे. या वर्तनाबद्दल तुम्ही आत्मचिंतन करण्याची गरज आहे. भारत आणि इस्त्राईल यांच्यादरम्यान अनेक प्रकारची समानता आहे. हे दोन्ही देश एकाच प्रकारच्या शत्रुशी लढत आहेत आणि ते शत्रू म्हणजे वाईट शेजारी. याची किमान जाणीव तुम्ही ठेवायला हवी होती.
'चित्रपट क्षेत्रातला मी तज्ज्ञ नाही पण ऐतिहासिक घटनांच्या अनुषंगाने तुम्ही असे असंवेदनशीलपणे बोलावयास नको होता. काश्मीरमधील हिंदुंचे पलायन ही भारतासाठी उघड जखम आहे आणि आजही असंख्य लोक त्याची किंमत चुकवित आहेत. 'होलोकास्ट' मधून वाचलेल्या कुटुंबातला मुलगा होण्याच्या नात्याने तुमचे विधान वाचून मला अतीव दु:ख झाले. याबद्दल मी तुमची निंदा करतो. इस्त्राईलमध्ये परत जाऊन विचार करा की तुम्ही काय बोलला आहात. भारत आणि इस्त्राईलमधील लोकांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. तुम्ही जे काही केले आहे, त्याने या संबंधांना धक्का पोहोचला आहे. एक माणूस म्हणून मला लाज वाटते आणि मी भारतीयांची माफी मागतो' असेही गिलान यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान अभिनेते अनुपम खेर यांनी 'असत्याची उंची कितीही असली तरी ते सत्यासमोर नेहेमी ठेंगणेच असते' असे सांगत द काश्मीर फाईल्समधील आपले काही फोटो शेअर केले आहेत. निर्माते अशोक पंडित यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, लॅपिड यांनी काश्मीर फाईल्सला असभ्य म्हणून भारताच्या दहशतवादाविरोधातील लढाईची टिंगल उडवली आहे. देशात भाजपचे सरकार असताना त्यांनी लाखो काश्मीरी पंडितांचा अपमान केला आहे. इफ्फीच्या विश्वसनीयतेसाठी देखील हा मोठा धक्का आहे. काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी 'सत्य ही सर्वात धोकादायक गोष्ट आहे, कारण ती लोकांना खोटारडा ठरवू शकते' इतक्याच मोजक्या शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.