Sher Shivraj : इफ्फीच्या इंडियन पॅनोरमात ‘शेर शिवराज’ची निवड | पुढारी

Sher Shivraj : इफ्फीच्या इंडियन पॅनोरमात ‘शेर शिवराज’ची निवड

पुढारी ऑनलाईन डेस्क : गोव्यात होऊ घातलेल्या ५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) २०२२ साठी चित्रपटांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे. (Sher Shivraj) भारताच्या अधिकृत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) ‘इंडियन पॅनोरमा’ या विभागात फिचर फिल्म विभागात दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शेर शिवराज’ या मराठी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. एकूण ३५४ भारतीय चित्रपटांपैकी निवडक अशा २५ फिचर फिल्म्स निवडण्यात आल्या आहेत. त्यात ‘शेर शिवराज’ चित्रपटाने बाजी मारली आहे. २० ते २८ नोव्हेंबर या काळात गोव्यात ‘इफ्फी’चे आयोजन होत आहे. (Sher Shivraj)

या निवडीबद्दल चित्रपटाचे निर्माते–अभिनेते चिन्मय मांडलेकर म्हणाले, ही निवड आमच्यासाठी खूप आश्वासक आहे. त्यातही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तो आहे याचा आनंद नक्कीच आहे. पण यापलीकडे हा केवळ चित्रपटाला मिळालेला बहुमान नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांची महती जगाला दाखवून देण्यासाठी ‘शिवराज अष्टक’ याचा जो यज्ञ दिग्पालने सुरु केला आहे त्याचा हा बहुमान आहे. ‘शिवराज अष्टक’ याच्या मध्यावर येऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर दिग्पालच्या चित्रपटाची घेतली गेलेली दखल एक निर्माता, अभिनेता आणि दिग्पालचा मित्र या नात्याने मला मोलाची वाटत आहे.

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणाले की, गेल्या ६ वर्षात कष्टाने केलेल्या ‘शिवराज अष्टक’ मालिकेला अव्याहतपणे प्रेक्षकांचे प्रेम मिळतंय. इफ्फी सारख्या मानाच्या ठिकाणी ही निवड होणं आणि त्याचे स्क्रीनिंग ही आमच्यासाठी खूपच प्रेरणादायी गोष्ट आहे. आमच्या पुढील वाटचालीसाठी हा बहुमान उर्जा देणारा आहे. आम्ही योग्य मार्गाने जातोय याची ही पोचपावती आहे.

शिवचरित्रातील ‘अफझलखान वध’ हा महत्त्वाचा अध्याय ‘शेर शिवराज’ चित्रपटातून मांडण्यात आला आहे. ‘शेर शिवराज’ चित्रपटाची निर्मिती मुंबई मुवी स्डुडिओजचे नितीन केणी, राजवारसा प्रोडक्शनचे प्रद्योत पेंढरकर व अनिल नारायणराव वरखडे यांनी केले आहे.

Back to top button