डिजिटल युगातही ‘चोपडी’चे महत्त्व कायम | पुढारी

डिजिटल युगातही ‘चोपडी’चे महत्त्व कायम

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : अधुनिक डिजिटल युगातही चोपडीचे महत्त्व कायम आहे. दिवाळी सणातील लक्ष्मी पूजनासाठी चोपडींची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. या दिवशी लक्ष्मी म्हणजेच धनासह हिशेबाच्या चोपडी व वहींचेही पूजन करण्याची परंपरा आहे. यामुळे आजही बाजारात पारंपरिक चोपडी व वह्यांना मोठी मागणी आहे. यंदा दिवाळीचा मुख्य दिवस म्हणजेच आज नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी कुबेर पूजन एकाच दिवशी आले आहे.

लक्ष्मी-कुबेर पूजनासाठी लागणार्‍या लहान-मोठ्या वह्या अगदी 15 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंत, दैनंदिन व्यवहाराच्या वह्या व चोपडी 175 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत दर आहे. याशिवाय पारंपरिक चोपडीप्रमाणे लाल कापडाचे आवरण असणार्‍या आणि लक्ष्मीचे चित्र असणार्‍या चोपड्या व वह्यांना विशेष मागणी आहे. घरामध्ये सुख-शांती नांदावी यासाठी पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या पूजा साहित्यात लाह्या-बत्तासे यांना विशेष महत्त्व आहे. या दिवशी सायंकाळी व्यापारी पेढ्यांवर लक्ष्मी, कुबेर व धन्वंतरी पूजन केले जाते. पेढ्यांवर चोपडीवहीचे पूजन केले जाते. आगामी वर्षातील हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसाच्या शुभ मुहूर्तावर केला जातो. विविध व्यावसायिक, दुकानदार त्यांच्या हिशेबाच्या वह्यांची सुद्धा पूजा करतात.

कॉम्प्युटरबरोबरच वही-चोपडींचा वापर

अधुनिक डिजिटल व इंटरनेटच्या जमान्यात व्यवसाय-व्यापार व उद्योगासाठीच्या हिशेबासाठी कॉम्प्युटरचा वापर अनिवार्य आहे. मात्र, अनेक व्यापारी आधुनिक कॉम्प्युटरबरोबरच पारंपरिक वही-चोपडींचाही वापर करताना दिसतात. बर्‍याचदा वही-चोपडीच्या हिशेबावरील भरवसा सार्थ ठरतो. कॉम्प्युटरला लाईट, इंटरनेटमधील रेंजचे अडथळे, व्हायरस, सर्व्हर डाऊन सारख्या तांत्रीक अडचणी येत असल्याने पारंपरिक वही व चोपडीतील हिशेब व्यापार्‍यांना उपयोगी पडतो.

Back to top button