

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन; देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची त्यांची वार्षिक परंपरा कायम ठेवली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमवारी (दि.२४) कारगिलमध्ये दाखल झाले. त्यांनी येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली. कारगिलच्या या विजयी भूमीवरून मी देशवासियांना आणि जगाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. पाकिस्तानशी झालेले असे एकही युद्ध नाही जिथे कारगिलने विजयाचा झेंडा फडकावला नसेल. दिवाळी म्हणजे 'दहशतवाद संपवण्याचा सण' आणि कारगिलने ते शक्य केले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांना संबोधित करताना म्हटले आहे. माझ्यासाठी तुम्ही वर्षानुवर्षे माझे कुटुंब आहात. दिवाळीचा गोडवा तुमच्यासोबत आल्यानंतर वाढतो, असेही मोदी म्हणाले.
"कारगिलमध्ये आमच्या सैन्याने दहशतवादाचा आणि त्यांच्या लोकांचा धुव्वा उडवला आणि देशाने विजयाची अशी दिवाळी साजरी केली की लोक आजही त्याची आठवण काढतात," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिलमधील सशस्त्र दलाच्या जवानांशी संवाद साधताना म्हटले. जसे तुम्ही सर्व सीमेवर आमचे रक्षण करत आहात, तसेच आम्ही दहशतवाद, नक्षलवाद, भ्रष्टाचार यांसारख्या वाईट गोष्टींशी लढण्यासाठी देशात कार्यरत आहोत. 'नक्षलवाद'ने देशाचा एक मोठा भाग आपल्या ताब्यात घेतला होता, पण आज तो भाग झपाट्याने कमी होत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. सशस्त्र सेना आपल्या सीमांचे रक्षण करत असल्यामुळे भारतातील प्रत्येक नागरिक शांतपणे झोपतो. मी भारताच्या सशस्त्र दलाला नमन करतो. तुमच्या बलिदानाचा आपल्या देशाला नेहमीच अभिमान आहे, असे ते म्हणाले.
गेल्यावर्षी पंतप्रधान मोदी यांनी जम्मूच्या नौशेरा येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. सीमेवर रक्षण करणारे आपले सैनिक हे देशाचे "सुरक्षा कवच" आहेत. सैनिकांमुळेच लोक शांतपणे झोपू शकतात, असे मोदी यांनी म्हटले होते. २०२० मध्ये पंतप्रधान मोदींनी राजस्थानमधील जैसलमेरच्या लोंगेवाला येथे सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. २०१९ मध्ये पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) राजौरी जिल्ह्यात सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. त्यांनी सैनिक हे आपले कुटुंब असल्याचे म्हटले होते.
२०१८ मध्ये पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडमधील हरसिल येथे भारतीय लष्कर आणि इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) दलातील जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. त्यानंतर त्यांनी केदारनाथ मंदिरात प्रार्थना केली होती. २०१७ मध्ये पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ खोऱ्यात लष्कराचे सैनिक आणि सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांसोबत दीपोत्सव साजरा केला होता. २०१६ मध्ये पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशात एका चौकीवर इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस कर्मचार्यांसोबत दिवाळी साजरी केली होती. २०१५ मध्ये त्यांनी पंजाब सीमेवर जात सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. २०१४ मध्ये पंतप्रधान मोदींनी सियाचीनमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती.
विशेष म्हणजे जेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून ते दिवाळीला सैनिकांची भेट घेऊन त्यांच्यासोबत सण साजरा करत आहेत. याआधी २१ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी यांनी बाबा केदारनाथ आणि बद्रीनाथचे दर्शन घेतले होते. त्यानंतर २३ ऑक्टोबरला ते अयोध्येतील दीपोत्सवात सहभागी झाले होते.
हे ही वाचा :