सातारा : सलग सुट्टयांनी महाबळेश्वर बहरले | पुढारी

सातारा : सलग सुट्टयांनी महाबळेश्वर बहरले

महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा :  जगप्रसिध्द पर्यटनस्थळ असलेले महाबळेश्वर दिवाळीतील सलग सुट्टीमुळे बहरण्यास प्रारंभ झाला आहे. रविवारी पर्यटकांच्या गर्दीने हे निसर्गरम्य पर्यटन स्थळ फुलल्याचे पहावयास मिळाले. अनेक पर्यटकांनी सनसेट बरोबरच वेण्णा लेकवर नौकाविहाराचा आनंद लुटला.

सध्या दिवाळीबरोबरच दिवाळीची सुट्टी सुरु झाली असल्याने महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पर्यटनास आलेले पर्यटक हिरवाईने नटलेले निसर्ग सौंदर्य पाहण्यात,अनुभवण्यात मश्गुल झाले असून पर्यटक गुलाबी थंडीची मजा लुटताना दिसत आहेत.

महाबळेश्वर येथे दिवाळी हंगामास प्रारंभ झाला असून देशविदेशातील पर्यटकांची रेलचेल या निसर्गरम्य पर्यटनस्थळी वाढली आहे. विशेषतः दिवाळी व उन्हाळी हंगामात पर्यटकांची संख्या लक्षणीय असते. सध्या दिवाळी सुट्टी असल्याने महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची पावले वळत असून येथील प्रसिद्ध केट्स पॉईंट, महाबळेश्वरची शान असलेला ऑर्थरसीट पॉईंट, किल्ले प्रतापगड, श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर, निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेला लॉडवीक पॉईंट, सूर्योदयासाठीचा प्रसिद्ध विल्सन पॉईंट, सूर्यास्तासाठी प्रसिद्ध मुंबई पॉईंटसह पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण असलेला लिंगमळा धबधबा या पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी होत आहे. पर्यटक येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत.

महाबळेश्वरचे मुख्य आकर्षणाचे ठिकाण व नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णालेक येथे नौकाविहारासाठी पर्यटकांच्या रांगा लागल्या असून अशा धुंद व आल्हाददायक वातावरणात पर्यटक नौकाविहार करताना पहावयास मिळत आहेत. तर, हौशी पर्यटक वेण्णालेकवर घोडेसवारीचा आनंद लुटताना दिसत आहेत. बालचमूंसाठी विविध गेम्सची धूम आहे तर खवय्यांसाठी विविध खाद्यपदार्थ गरमागरम मका कणीस,फ्रँकी,पॅटिस,पाणीपुरी, भेळ,पावभाजी,मॅगी अशा पदार्थांवर ताव मारताना पर्यटक दिसत आहेत.

महाबळेश्वरच्या गुलाबी थंडीची अनुभूती पर्यटक घेत असून शाल, मफलर, कानटोपी अशी उबदार वस्त्रे परिधान करून ते फेरफटका मारताना दिसत आहेत. पर्यटनास येणार्‍या पर्यटकांच्या स्वागतासाठी येथील मुख्य बाजारपेठा सजल्या असून पर्यटक खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करत आहेत. बाजारपेठेतील प्रसिद्ध चप्पल खरेदीबरोबरच चणे,जाम,जेली,चॉकलेट फज अशा वस्तूंवर ताव मारताना दिसत आहेत. महाबळेश्वर येथील प्रसिध्द पॉईंटवरील सूर्यास्ताचा अनेक पर्यटकांनी आनंद लुटला. येथील सौंदर्य पाहून पर्यटकांचे भान हरपले.

Back to top button