२०१९ मध्ये सलमानला मारण्याचा रचला होता कट, बिश्नोईचा गुंड पंडितने केला खुलासा | पुढारी

२०१९ मध्ये सलमानला मारण्याचा रचला होता कट, बिश्नोईचा गुंड पंडितने केला खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क : गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक असलेल्या कपिल पंडितने सलमान खान विषयी मोठा खुलासा केला आहे. त्याने मुंबई गुन्हे शाखेला सांगितले की, फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांने अभिनेता सलमान खानच्या पनवेल येथील फार्महाऊसवर नजर ठेवली होती. अलिबागमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात सलमानला मारण्याचा कट रचला होता. मात्र, अलिबागचा कार्यक्रम सलमानने रद्द केला आणि त्यांचा कट फसला. कपिल पंडित हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीतील कथित गुंड आहे. आता मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी अभिनेता सलमान खानची सुरक्षा वाढवली आहे.

मागच्या आठवड्यात मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने कपिल पंडितची चौकशी केली. पंडित म्हणाला की, सलमानला मारण्यासाठी तीन हत्यारे तयार ठेवण्यात आली होती. तसेच पनवेलमध्ये सलमानची गाडी अडवण्याची योजना आखली होती. नंतर, त्यांने सलमानच्या फार्महाऊसवरील सुरक्षा रक्षकाशी सलमानचा चाहता म्हणून मैत्री करण्याचा प्रयत्न केला आणि अभिनेत्याबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला. कर्जत आणि पालघर येथे भाड्याने खोलीमध्ये पंडित राहत असे. त्याच्यासोबत असणाऱ्या संतोष जाधवसह आणखी चार जणांची नावे त्याने दिली आहेत. पालघरमध्ये ते २ महिने राहिले. आणि एक महिना कर्जतमध्ये राहिले.

सलमानच्या भेटी आणि इतर तपशील रेकॉर्ड करण्यासाठी ते येथे राहिले होते. कपिल पंडित पंजाब पोलिसांच्या ताब्यात आहे. मुंबई पोलिस त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतील, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

 

Back to top button