Kerala bandh | पीएफआयने पुकारलेल्या केरळ बंदला हिंसक वळण, बसेसवर दगडफेक, पोलिसांवर हल्ला | पुढारी

Kerala bandh | पीएफआयने पुकारलेल्या केरळ बंदला हिंसक वळण, बसेसवर दगडफेक, पोलिसांवर हल्ला

तिरुअनंतपूरम : दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक पुरवठा करण्याचा गंभीर आरोप झालेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयच्या ११ राज्यांतील १०६ ठिकाणांवर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुरुवारी एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत शंभरपेक्षा जास्त संशयितांना अटक करण्यात आली. या कारवाईला विरोध करत पीएफआयने केरळ बंद (Kerala bandh) पुकारला आहे. सकाळी ६ वाजता सुरू झालेला हा बंद सायंकाळी ६ वाजेपर्यंत १२ तास राहणार आहे. पण बंदला आज शुक्रवारी हिंसक वळण लागले. केरळ बंद दरम्यान कोल्लम जिल्ह्यातील पल्लिमुक्कू येथे दुचाकीवरून आलेल्या दोन पीएफआय समर्थकांनी दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. राज्यातील अनेक भागात वाहनांवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत.

वायनाड जिल्ह्यातील पनारामम गावात केरळ राज्य परिवहन महामंडळाच्या (KSRTC) बसेसवर पीएफआय समर्थकांनी दगडफेक केली. ही बस कोझिकोडला जात होती. कोझिकोड, कोची, अलाप्पुझा आणि कोल्लममध्ये केएसआरटीसीच्या बसेसवरही हल्ले करण्यात आले.

कोझिकोड आणि कन्नूर येथे पीएफआय समर्थकांनी केलेल्या दगडफेकीत १५ वर्षीय मुलगी आणि एक रिक्षाचालक किरकोळ जखमी झाले आहेत. तर अलाप्पुझा येथे झालेल्या दगडफेकीत केएसआरटीसी बसेस, एक टँकर लॉरी आणि काही इतर वाहनांचे नुकसान झाले आहे. (Kerala bandh)

परवानगीशिवाय राज्यात कोणीही बंद पुकारू शकत नाही- हायकोर्ट

केरळमध्ये एक दिवसीय राज्यव्यापी बंद पुकारल्याच्या घटनेची केरळ हायकोर्टाने स्वेच्छा दखल घेतली आहे. परवानगीशिवाय राज्यात कोणीही बंद पुकारू शकत नाही, असा आदेश केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.

मागील काही वर्षांपासून पीएफआयवर दहशतवाद आणि हिंसाचार पसरविणे, टेरर फंडिंग, समाजात विद्वेष पसरविणे आदी गंभीर आरोप झालेले आहेत. पीएफआयच्या प्रदेश आणि जिल्हा स्तरावरील नेत्यांच्या घरांवर काल प्रामुख्याने छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईनंतर कर्नाटकातील मंगळूर, केरळमधील मंजुरी तसेच तामिळनाडूतील डिंडीगुल येथे पीएफआय समर्थकांनी विरोध केल्याचे पहावयास मिळाले. टेरर फंडिंग तसेच दहशतवादी कृत्यासाठी ट्रेनिंग कॅम्प चालविणार्‍या लोकांना आश्रय देण्याचा संशय असलेल्या पीएफआयच्या संशयितांवर कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगण, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांत एनआयएकडून काल दिवसभर छापेमारी सुरु होती. एनआयएच्या या मोहिमेत ईडी तसेच संबंधित राज्यांचे पोलिस सामील झाले होते.

एकीकडे एनआयएची देशभरात कारवाई सुरू असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठक घेत कारवाईचा आढावा घेतला. या बैठकीस गृह खात्याचे सचिव, एनआयएचे महासंचालक तसेच संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. कारवाईदरम्यान ज्या संशयितांना अटक करण्यात आली आहे, त्यात पीएफआयचा दिल्ली प्रमुख परवेज अहमद आणि केरळमधील मंजुरी येथील सलीम नावाच्या इसमाचा समावेश आहे. कारवाईदरम्यान केरळमधून २२, महाराष्ट्र आणि कर्नाटकातून प्रत्येकी २० लोकांना अटक करण्यात आली. याशिवाय उत्तर प्रदेशातून ८, तामिळनाडूतून १९, आसाममधून ९, राजस्थानमधून २, मध्य प्रदेशातून ४, दिल्लीतून ३ तर आंध्र प्रदेशातून ५ लोकांना अटक करण्यात आली आहे. पीएफआयच्या आंध्र प्रदेशातील ठिकाणांवर गेल्या रविवारी एनआयएने छापे टाकले होते. त्यावेळी काही संशयितांना चौकशीसाठी नेण्यात आले होते.

देशाच्या २२ राज्यांत सक्रिय असलेल्या पीएफआयने गेल्या काही वर्षात तपास संस्थांची झोप उडविलेली आहे. सुरुवातीला केरळ आणि कर्नाटकमध्ये सक्रिय असलेल्या पीएफआयने आपला देशभरात विस्तार केला आहे. पीएफआयची दृष्यकृत्ये पाहून त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी देखील होत आहे. या संघटनेला आशिया तसेच आखाती देशांतून अर्थसहाय्य मिळते. पीएफआयचे मुख्यालय याआधी कोझिकोडे येथे होते. त्यानंतर मुख्यालय दिल्लीत नेण्यात आले होते.

हे ही वाचा :

Back to top button