गणेशोत्सवानंतर राज्यात कोरोना संसर्गात घट; मृत्युदरही नगण्य | पुढारी

गणेशोत्सवानंतर राज्यात कोरोना संसर्गात घट; मृत्युदरही नगण्य

पुणे; पुढारी वृत्तसेवा: गणेशोत्सवानंतर कोरोनाचा संसर्ग वाढेल, अशी शक्यता विविध स्तरांतून वर्तवण्यात आली होती. मात्र, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मागील एक महिन्याच्या आकडेवारीवरून राज्यातील संसर्ग कमी होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. गणेशोत्सवाच्या तुलनेत पुढील दहा दिवसांमध्ये रुग्णसंख्या 2 हजारांनी कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे.

गणेशोत्सवापूर्वीच्या दहा दिवसांमध्ये म्हणजेच 21 ते 30 ऑगस्टदरम्यान राज्यात 16,187 कोरोनाबाधितांचे निदान झाले. गणेशोत्सव काळात दहा दिवसांमध्ये 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत 8278 कोरोनाबाधित आढळले. त्यानंतरच्या 10 दिवसांमध्ये म्हणजेच 10 ते 19 सप्टेंबर या काळात 6437 कोरोनाबाधितांचे निदान झाले.

राज्यातील आकडेवारीप्रमाणेच पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्याही कमी होताना दिसत आहे. 21 ते 30 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात 2452 कोरोनाबाधित आढळून आले. गणेशोत्सवात 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत 2326 कोरोनाबाधितांचे निदान झाले. गणेशोत्सवाच्या पुढील दहा दिवसांत 10 ते 19 सप्टेंबरदरम्यान 1791 रुग्णांना कोरोनाची लागण झाली.

जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये 7 जणांचा मृत्यू
कोरोना विषाणूचा कमी झालेला प्रभाव, सामूहिक प्रतिकारशक्ती, लसीकरण या सर्वांचा परिणाम म्हणून राज्यातील आणि जिल्ह्यातील मृत्युदरही नगण्य आहे. सप्टेंबर महिन्यात राज्यात दररोजचे मृत्यूचे प्रमाण सरासरी 4 ते 5 इतके आहे. पुणे जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात केवळ 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

सध्या राज्याची वाटचाल पेंडेमिककडून एंडेमिककडे सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोना संसर्गाचा आलेख उतरता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनेही सूचित केले आहे. संसर्गाची तीव्र ता सौम्य व सामूहिक प्रतिकार शक्ती विकसित झाल्याने सध्या रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. तरीही निष्काळजीपणा न करता लसीकरणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. विशेषतः अतिजोखमीच्या म्हणजेच ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांची काळजी घेणे आवश्यक आहे.

                                         – डॉ. प्रदीप आवटे, रोग सर्वेक्षण अधिकारी, महाराष्ट्र राज्य

 

Back to top button