श्रीदेवी ते रीना रॉयपर्यंत पडद्यावर साकारली इच्छाधारी ‘नागिण’ | पुढारी

श्रीदेवी ते रीना रॉयपर्यंत पडद्यावर साकारली इच्छाधारी 'नागिण'

पुढारी ऑनलाईन डेस्क : मोठा पडदा असो की छोटा पडदा, अनेकदा ‘नागिण’ विषयांवर आतापर्यंत अनेक चित्रपट किंवा मालिकांची निर्मिती केली गेली आहे. त्या त्या नागिणीच्या कथा आणि पात्रेदेखील प्रसिध्द झाली आहेत. अनेक प्रसिद्ध अभिनेत्री आणि अभिनेत्यांनी नाग-नागिनच्या कथांवर आधारित चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यांची आजही आठवण येते. असे अनेक चित्रपट आहेत, ज्यामध्ये नाग-नागिण हे मनुष्य रुपात दाखवण्यात आले आहेत. यामध्ये नागिणच्या अवतारातील अभिनेत्रींना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. नाग-नागिणच्या अवतारात कोणत्या नायिकांनी मोठ्या पडद्यावर आपली प्रतिमा निर्माण केली, ते पाहुया.

श्री देवी

मोठ्या पडद्यावर सुंदर नागाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक श्रीदेवीदेखील आहे. जिने आपल्या सुंदर निळ्या डोळ्यांनी नागिण बनून प्रेक्षकांची मने जिंकली. तिला पडद्यावर पाहताना जणू ती खरोखरचं नागिण आहे, इतका जीवंत अभिनय तिच्यात दिसला होता. ‘नगीना’ चित्रपटात तिच्यासोबत दिवंगत अभिनेते ऋषी कपूर, अमरीश पुरी, जगदीप आणि सुषमा सेठी मुख्य भूमिकेत होते. इच्छाधारी नागीन या व्यक्तिरेखेचा विचार केला तर दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचाच चेहरा समोर येतो.

पडद्यावर नागिणची भूमिका साकारून श्रीदेवीने भीती आणि सौंदर्याचा अद्भुत संगम दाखवला होता. ‘नगीना’ चित्रपटातील ‘मैं तेरी दुश्मन दुश्मन तो मेरा…’ या गाण्यातील तिचा नागिन डान्स आजही लोकांना आवडतो. या चित्रपटातील तिच्या व्यक्तिरेखेला चांगलीच पसंती मिळाली होती. चित्रपटातील श्रीदेवी आणि अमरीश पुरी यांच्या अनेक दृश्यांनी आजही लोकांच्या मनात आपली छाप सोडली आहे.

रीना रॉय

१९७६ मध्ये आलेला ‘नागिन’ हा चित्रपट त्या काळातील सर्वात सुपरहिट चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटात अनेक मोठे सुपरस्टार एकत्र दिसले. ही कथा इच्छाधारी नाग आणि नागिनवर आधारित आहे. ज्यामध्ये काही मित्र चुकून नागाला बंदुकीने गोळ्या घालून ठार करतात आणि मग सर्वांचा बदला घेण्यासाठी नागिण माणसाच्या रूपात येते. या चित्रपटात रीना रॉय नागिणच्या भूमिकेत दिसली होती. तर अभिनेते जितेंद्र नागाच्या भूमिकेत दिसले. या चित्रपटात सुनील दत्त, फिरोज खान, संजय खान, रेखा आणि मुमताजदेखील दिसले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

रेखा

बॉलीवूडची सदाबहार अभिनेत्री रेखाने अनेक उत्तम भूमिका साकारल्या आहेत. तिने चित्रपट ‘शेषनाग’मध्ये एका नागिणची भूमिका साकारली होती. या चित्रपटात दोन इच्छाधारी नागाची कहाणी दाखवण्यात आली आहे. जितेंद्र आणि रेखा यांच्या मुख्य भूमिका या चित्रपटात होत्या. एकदा रेखाने आपल्या या भूमिकेविषयी सांगितलं होतं की, ती किती उत्तम पध्दतीने नागिणची भूमिका साकारू शकते. रेखाने साकारलेली नागिणदेखील लोकांना खूप भावली होती.

मनीषा कोईराला

‘नागिन’ चित्रपटाचा दिग्दर्शक राजकुमार कोहली हा चित्रपट पाहून खूप खूश झाला. याच विषयावर त्याने अरमान कोहलीसोबत आणखी एक चित्रपट बनवला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचा मुलगा अरमानचा हा पहिला आणि शेवटचा चित्रपट होता. होय, अभिनेत्री मनीषा कोईरालाने ‘जानी दुश्मन’ चित्रपटात नागाची भूमिका साकारली होती. तर अरमान कोहली नागाच्या भूमिकेत दिसला.

हा चित्रपट काही विशेष जादू दाखवू शकला नाही आणि अरमानच्या करिअरमधील हा शेवटचा चित्रपट ठरला. चित्रपट ‘जानी दुश्मन’ मध्ये मनीषा कोईरालाने एक इच्छाधारी नागिनची भूमिका साकारली होती. या नागिणसोबत एक मनुष्य आणि मग आत्मा अशा भूमिका होत्या. चित्रपटात दाखवण्यात आलं होतं की, मनीषा कोईराला आधी एक इच्छाधारी नागिण असते. एका मुनीद्वारा दिलेल्या शापामुळे तिचा मृत्यू होतो. मग, पुन्हा एका मनुष्याच्या रुपात ती जन्म घेते. या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली होती.

बॉलीवूडची ग्लॅमरस अभिनेत्री मल्लिका शेरावतनेदेखील मोठ्या पडद्यावर नागिणची भूमिका साकारलीय. या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं की, नागिण झालेल्या मल्लिका शेरावत आपल्या नागाच्या शोधात बाहेर पडते. अनेक संकटांनंतर ती नागापर्यंत पोहोचते.

मीनाक्षी शेषाद्रि

दामिनी चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात करणारी मीनाक्षी शेषाद्रिदेखील नागिणच्या रुपात प्रेक्षकांसमोर आलीय. चित्रपट ‘नाचे नागिन गली गली’ मध्ये मीनाक्षी एक नागिण असते. तर नितीश भारद्वाज नाग असतो. या चित्रपटामध्ये नागमणीच्या सुरक्षेची कहाणी दाखवण्यात आली होती.

Back to top button