Sreejith Ravi : प्रायव्हेट पार्ट दाखवण्याच्या आरोपाखाली मल्याळम अभिनेत्याला अटक | पुढारी

Sreejith Ravi : प्रायव्हेट पार्ट दाखवण्याच्या आरोपाखाली मल्याळम अभिनेत्याला अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रीजीत रवी (Sreejith Ravi) याला सार्वजनिक उद्यानात अल्पवयीन मुलींना गुप्तांगं दाखवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोक्सो (POCSO)अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका काळ्या रंगाच्या चारचाकीतून आलेल्या एका व्यक्तीने उद्यानात त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याची तक्रार ४ जुलै रोजी दोन अल्पवयीन मुलींनी पोलिसांकडे केली. मुलींनी केलेल्या तक्रारीनंतर त्रिशूर पश्चिम पोलिसांनी कारवाई करत सीसीटीव्ही फुटेज पाहून गाडीचा शोध घेतला. पोलिस जेव्हा आरोपीच्या घरी पोहोचले तेव्हा कळले की, तो अभिनेता श्रीजीत आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्याच्याविरोधात आता लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) कलम ११ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२०१६ मध्ये श्रीजीत रवीवर अटक करण्यात आली होती. त्यावेळीही काही मुलींनी अश्लील चाळे केल्याचा आरोप केला होता. पण नंतर श्रीजीत रवीला जामीन मिळाला होता.

श्रीजीत हा ज्येष्ठ अभिनेते टी.जी. रवी यांचा मुलगा आहे. श्रीजीत हा मेकॅनिकल इंजिनियर आहे. त्याच्याकडे मॅनेजमेंटची डिग्री देखील आहे. त्याने २००५ मध्ये मल्याळम चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि आतापर्यंत त्याने ७० हून अधिक सिनेमांत काम केलं आहे.

२००५ मध्ये ‘मायोखाम’ या चित्रपटातून श्रीजीतने मॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘चंथुपोट्टू’ या चित्रपटातून श्रीजीतला मोठा ब्रेक मिळाला. त्यानंतर मल्याळम आणि तमिळ चित्रपटांतून श्रीजीतचा चित्रपटाचा धडाका सुरु झाला. मिशन ९० डेज, पुण्यलन अगरबत्तीस आणि पुण्यलन प्रायव्हेट लिमिटेड यात श्रीजीत झळकला आहे. पुण्यलन अगरबत्तीस या चित्रपटातील अभिनयासाठी श्रीजीतला २०१३ मध्ये सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकाराचा SIIMA पुरस्कार मिळाला. तर विनयन दिग्दर्शित पथोनपथम या आगामी चित्रपटात श्रीजीत (Sreejith Ravi) दिसणार आहे.

Back to top button