नारायणगाव : बनावट बियाण्यांच्या विक्री प्रकरणी दोघांना अटक | पुढारी

नारायणगाव : बनावट बियाण्यांच्या विक्री प्रकरणी दोघांना अटक

नारायणगाव, पुढारी वृत्तसेवा: सोयाबीन व कांदा या पिकांच्या बनावट बियाणाची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दोन जणांना नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन कांदा व सोयाबीन बियांणाच्या २६ पिशव्यासह जीप जप्त केल्याची माहिती नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली असता त्यांना जामीन मिळाल्याने शेतकरी वर्गात याबाबत चर्चा होत आहे. रामेश्वर मनोहर देशमुख (रा. तळणी, ता. मंठा, जि. जालना) आणि लोकेश शंकर डुंबरे (रा. राजुरी, ता. जुन्नर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे असून याबाबतची फिर्याद जुन्नर पंचायत समितीचे कृषी अधिकारी निलेश प्रकाश बुधवंत यांनी दिली आहे.

फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार दत्तात्रय तुकाराम वऱ्हाडी (रा. पिंपळगाव तर्फे नारायणगाव, ता. जुन्नर) यांनी बुधवारी ६ जून रोजी आरोपीकडून २० किलो वजनाची सोयाबीन बियाणाची पिशवी खरेदी केली. पेरणी करण्यापूर्वी वऱ्हाडी यांनी बियाणाच्या पिशवीवरील मजकुराचे वाचन केले असता बियाणाच्या पिशवीवर बियाणांची उगवन क्षमता, शुद्धता, परीक्षण दिनांक, टॅग नंबर, शिफारस हंगाम व बियाणे सत्यता दर्शक लेबल आदी माहीती आढळुन आली नाही. संशय आल्याने वऱ्हाडी यांनी याबाबतची माहिती आमदार अतुल बेनके, पंचायत समिती जुन्नरचे कृषी अधिकारी तथा बियाणे निरीक्षक नीलेश प्रकाश बुधवंत यांना दिली.

त्यानंतर तालुका कृषी अधिकारी सतिश शिरसाठ, बियाणे निरीक्षक बुधवंत व वऱ्हाडी यांनी निलायम हॉटेलजवळ बियाणे विक्रीसाठी आलेले रामेश्वर देशमुख आणि लोकेश डुंबरे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ असलेल्या गाडीत सोयाबीन बियांणाच्या प्रत्येकी २० किलो वजनाच्या पाच पिशव्या, कांदा बियांणाच्या २० पिशव्या आढळून आल्या. आरोपीकडे बियाणे विक्रीचा परवाना, उगम प्रमाणपत्र आदी कागदपत्रे आढळून आली नाही.

शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना विक्रेत्याकडून पक्की पावती घ्यावी. कृषी विभागाने सतर्क राहून बनावट बियाणे विक्री करणाऱ्यांचा शोध घ्यावा. रामेश्वर देशमुख, लोकेश डुंबरे यांच्याकडून सोयाबीन व कांदा बियांणाची ज्या शेतकऱ्यांनी खरेदी केली आहे अशा शेतकऱ्यांनी याबाबतची तक्रार नारायणगाव पोलीस ठाण्यात करावी. या कामात हलगर्जी करणाऱ्या संबंधित कृषी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

– अतुल बेनके, आमदार, जुन्नर

Back to top button