‘प्यार का पंचनामा’मधील ‘या’ अभिनेत्रीला करायचाय मराठी चित्रपट | पुढारी

'प्यार का पंचनामा'मधील 'या' अभिनेत्रीला करायचाय मराठी चित्रपट

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्यार का पंचनामा, सोनू के टिट्टू की शादी, छलांग, ड्रीमगर्ल अशा अनेक चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री नुसरत भरूचा हिला आता मराठी चित्रपट करायचाय. आता विशाल भानुशाली यांची निर्मिती आणि जय बसंत सिंग यांचे दिग्दर्शन असलेल्या जनहितमध्ये जारी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. या संदर्भात नुसरत भरुचा हिने नुकतीच पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

यावेळी नुसरत म्हणाली, जनहित मे जारी हा चित्रपट खूप मजेशीर आहे. यामध्ये सामाजिक संदेशही देण्यात आला आहे. आपल्या समाजात काही गोष्टी अशा असतात की, त्या जनतेच्या हिताच्या असतात; परंतु त्या लक्षात येत नाहीत. याच गोष्टी आपण चित्रपटाच्या माध्यमातून दाखविल्या तर लोकांच्या लक्षात राहतात. मनोरंजनाच्या माध्यमातून त्यांना दाखविल्या तर लगेच पटतात. या चित्रपटात असाच एक छानसा विषय मांडण्यात आला आहे.

Nushrratt Bharuccha
Nushrratt Bharuccha

हा चित्रपट मनोरंजन करणारा आहेच त्याचबरोबर सामाजिक संदेशही देणारा आहे. या चित्रपटात माझे मोठे कुटुंब दाखविण्यात आले आहे. या चित्रपटात माझे आई-वडील आणि आम्ही चार भावंडे आहोत. माझ्या व्यक्तिरेखेचे नाव मन्नू आहे. तिचे आई-वडील तिने लग्न करावे, असा तगादा लावतात. मात्र ती स्वतःच्या पायावर उभी राहू इच्छिते. त्याप्रमाणे ती सेल्सगर्लचे काम करीत असते. स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी राहते आणि मग ती लग्न करते. लग्नानंतर तिच्या आयुष्यात काही बदल घडतात. त्यानंतर तिच्या नोकरीतही काही बदल घडत जातो आणि ती सेल्सगर्ल म्हणून कंडोम विकण्याचे काम करते आणि फॅमिली प्लॅनिंगबद्दल जनजागृती कशी करते, याची मजेशीर कहाणी या चित्रपटात आहे.

नुसरत  म्हणाली, या चित्रपटात माझी मुख्य भूमिका आहे. अलीकडच्या काळात नायिकाप्रधान चित्रपटांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. नायिकांचे चित्रपटदेखील शंभर कोटी रुपयांचा व्यवसाय करू शकतात हे सिद्ध झाले आहे. माझ्या चित्रपटातील कामाला लोकांनी पसंती दिली आहे. माझ्या कामाचे कौतुक त्यांनी केले आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि यापुढेही उत्तमोत्तम चित्रपट करून त्यांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. कारण लोकांनी आपल्या कामाचे कौतुक केल्यानंतर आपलीही जबाबदारी खूप वाढलेली आहे आणि त्याचे भान ठेवूनच मी अधिकाधिक चांगले चित्रपट करणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button