प्रार्थना सौभाग्याची… पूजा वटपौर्णिमेची! | पुढारी

प्रार्थना सौभाग्याची... पूजा वटपौर्णिमेची!

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
आयुष्य वाढावे आणि पुढचे सात जन्म हाच पती मिळावा, यासाठी साजर्‍या होणार्‍या वटपौर्णिमेचे मागील काही वर्षांत स्वरूप बदलले आहे. काळानुरूप पर्यावरणाचे जतन करत असतानाच धार्मिक परंपरेचे पालन करून सामाजिक भावनेतून हा सण साजरा केला जात आहे. वडाच्या झाडाच्या फांदीपासून बोन्साय झाडे आणि आता तर प्रतिमेचे पूजन करून वटपौर्णिमा साजरी केली जाते. याकरिता आता स्थानिक बाजारपेठेसह ऑनलाईन मार्केटमध्ये आतापासून वटपौर्णिमा पूजा साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे.

शहरातील पर्यावरणवादी संस्था संघटनांमधून वटपौर्णिमेला झाडांच्या फांद्या न तोडता त्याचे रोपटे दत्तक स्वरूपात दिले जाते. याशिवाय काही महिला जागेअभावी बोन्सायच्या वृक्षांचाही पर्याय अवलंबत आहेत. इतकेच नाही, तर यापुढेही एक पाऊल पुढे टाकत अलीकडच्या दोन वर्षांत वडाच्या झाडाच्या प्रतिमांचे पूजन केले जाते. बाजारात पाटावरील वडाचे झाड, स्टिकर्स, फोटो फ्रेम प्रकारात प्रतिमा उपलब्ध आहेत. त्याशिवाय रांगोळी स्टिकर्सही विक्रीसाठी सज्ज आहेत. वटपोर्णिमा सणाला वडाच्या झाडाला महत्त्व आहे. वड आपल्या सावलीत अनेक जीवनोपयोगी घटकांना वाढवतो, महणूनच वडाची पूजा करण्यामागे त्याच्या संरक्षणाच्या जबाबदारीची जाणीव ठेवणे हा ही एक उद्देश आहेच. वडाच्या पारंब्यासारख्याच जन्मोजन्मीच्या गाठी बांधलेल्या
असतात.

कॉम्बो पॅकिंगमध्ये पूजा साहित्य उपलब्ध

ऑनलाईन मार्केटही प्रत्येक सणाप्रमाणे वटपौर्णिमेनिमित्त सज्ज झाले आहे. महिलांचा उत्साह आणि ऑनलाईन खरेदीची आवड पाहता या सणासाठी कॉम्बो पॅकिंगमध्ये पूजनाचे साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. यामध्ये एकूण 10 वस्तूंचा समावेश आहे. आसन, ताटावरचा रुमाल, ओटी बटवा, पोथी कव्हर, पूजा विधी पुस्तक, वड प्रतिमा आदी साहित्य खरेदी करता येते.

Back to top button