नाशिक : ती वाहतूक बेटे काढा; पादचारी मार्ग अन् पार्किंग झोन हवेत | पुढारी

नाशिक : ती वाहतूक बेटे काढा; पादचारी मार्ग अन् पार्किंग झोन हवेत

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
अपघातसत्राने निर्माण झालेल्या रस्ता सुरक्षेच्या प्रश्नावरून सर्वच स्तरांतून चिंता व्यक्त झाल्यानंतर मनपा आयुक्तांनी सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेत अपघातप्रवण क्षेत्रांची पाहणी केली. याप्रसंगी तांत्रिकद़ृष्ट्या योग्य नसलेले वाहतूक बेटे काढावीत, प्रमुख रस्त्यांवर पादचारी मार्ग, पार्किंग अन् हॉकर्स झोनची व्यवस्था झाल्यास वाहतूक सुरळीत होऊन अपघातांचे प्रमाण घटेल, अशा सूचना सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्या.

गिरणा पुलावर युवकाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर असुरक्षित रस्त्यांवरून प्रशासनावर ताशेरे ओढले गेले. मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी गांभीर्याने घेत बुधवारी (दि. 25) मोतीबाग नाका ते गिरणा पुलापर्यंत पाहणी केली. याप्रसंगी विशेष सरकारी वकील शिशिर हिरे, आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीचे सदस्य, मनपाचे अधिकारी आणि वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रभारी अधिकारी उदयसिंग मोहारे हेदेखील उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांत अनेक अपघात होऊन त्यात चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यास रस्त्यांची दुरवस्था आणि गैरव्यवस्था कारणीभूत ठरत असल्याची बाब यावेळी निदर्शनास आणून देण्यात आली. आयुक्तांनी सूचनांचा स्वीकार करून प्रशासकीय कार्यवाहीचे आश्वासन दिले.

या उपाययोजनांची गरज – प्रमुख रस्त्यांवर दुभाजक टाकावे. रिफ्लेक्टर बसविण्यात यावेत. उच्च प्रकाश क्षमतेचे पथदीप उभारावेत. अतिरहदारीच्या मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी भारतीय रोड काँग्रेसच्या नियमानुसार रबरी स्पीड ब्रेकर बसवावेत. खड्डेमुक्त रस्ते करावेत. मोतीबाग नाका ते मनमाड चौफुली तसेच भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय ते टेहरे फाटापर्यंतचा रस्ता तत्काळ दुरुस्त करावा. मुख्य रस्त्यांलगत पादचारी मार्ग विकसित करावा. महत्त्वाचे चौक व शहराच्या प्रवेशमार्गांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी. सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करून ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करावेत. पर्यायी मार्ग निर्माण करावेत. परिवहन समितीची बैठक घेऊन पार्किंग व्यवस्था, हॉकर्स झोन, रिक्षा स्टॉप, बसथांबा, नो पार्किंग स्पॉट, वन वे बाबत विस्तृत आराखडा तयार करावा आदी महत्त्वपूर्ण सूचना यावेळी करण्यात आल्या.

हेही वाचा:

Back to top button