'दुर्दम्य लोकमान्य'नंतर आता उत्सुकता 'कालजयी सावरकर'ची!! | पुढारी

'दुर्दम्य लोकमान्य'नंतर आता उत्सुकता 'कालजयी सावरकर'ची!!

पुढारी ऑनलाईन डेस्क

‘दुर्दम्य लोकमान्य’ ह्या लोकमान्य टिळकांच्या आयुष्याचे पदर नव्याने उलगडून सांगणाऱ्या माहितीपटाची मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष स्क्रिनिंगसाठी निवड करण्यात आलीय. येत्या ३१ मे रोजी दुपारी २ वाजता या माहितीपटाचे स्क्रिनिंग पेडर रोडवरील फिल्म डिव्हिजन येथे होणार आहे. याच पार्श्वभूमीवर ‘विवेक समूह’ आणखी एका लघुपटाची निर्मिती करीत असल्याची माहिती समोर आली आहे.

या नव्याने येऊ घातलेल्या लघुपटाचीही आता चांगलीच चर्चा होत आहे. यासंबंधी अधिकृत घोषणा झालेली नसली तरी हा लघुपट ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यावर बेतलेला असेल असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. ‘कालजयी सावरकर’ असे या नव्या लघुपटाचे नाव आहे. नुकतेच त्याचे पहिले पोस्टर समाज माध्यमातून प्रदर्शित करण्यात आले आहे.

या लघुपटातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्याचे विविध पैलू आणि अंतरंग उलगडून दाखवण्यात येणार आहेत.

लघुपटाचे लेखन अभिनेत्री आणि लेखिका समीरा गुजर आणि अमोघ पोंक्षे यांनी केले आहे. अक्षय जोग यांनी संशोधनासाठी लागणारे सहाय्य केले आहे. या लघुपटात नक्की कुठले कलाकार असणार आहेत आणि ते कुठली भूमिका साकारणार आहेत याबाबत अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर या लघुपटात सावरकरांची मुख्य भूमिका कोण साकारणार याविषयी विलक्षण उत्सुकता आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्याचे चित्रण करण्यापलीकडे हा लघुपट त्यांच्या कालातीत विचारांना केंद्रस्थानी ठेऊन त्यावर भाष्य करताना दिसेल असे लघुपटाच्या नावावरून लक्षात येत आहे.

Back to top button