Nashik : आता एका क्लिकवर कळणार खतांचा साठा | पुढारी

Nashik : आता एका क्लिकवर कळणार खतांचा साठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
युक्रेन व रशिया युद्धाच्या परिस्थितीमुळे यावर्षी खतांच्या आयातीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामात शेतकर्‍यांना पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभागाने एक लिंक उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आपल्या परिसरातील कोणत्या खतविक्रेत्याकडे कोणती खते उपलब्ध आहेत, याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. (Nashik)

जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे व मोहीम अधिकारी अभिजित जमधडे यांनी सांगितले की, मागील तीन वर्षांच्या सरासरी वापराचा विचार केल्यास, नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत पुरेसा खतसाठा उपलब्ध आहे. शेतकर्‍यांना आपल्या परिसरातील खतविक्री केंद्रात कोणत्या खतांचा साठा शिल्लक आहे, हे https://krushivibhag11.blogspot.com/2022/04/12-4-22.html या लिंकद्वारे घरबसल्या पाहता येणार आहे. शेतकर्‍यांनी खताच्या विशिष्ट ग्रेड व कंपनीचा आग्रह न धरता, पर्यायी खतांचादेखील वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे खर्चात बचतदेखील होणार आहे.
शेतकर्‍यांना 1 जूननंतर कपाशी बियाणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. नाशिक (Nashik) जिल्ह्यात गुणवत्ता नियंत्रणाच्या द़ृष्टीने जिल्हा स्तरावर एक व तालुका स्तरावर 15 भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.

कृषिनिविष्ठा विक्री केंद्रचालकांचे तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षणवर्ग घेण्यात आले असून, शेतकर्‍यांना गुणवत्तापूर्ण निविष्टा रास्त दरात उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी पक्क्या बिलातच व अधिकृत कृषिनिविष्ठा विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभाग करीत आहे.

तक्रार निवारण कक्षाची स्थापना
जिल्ह्यातील (Nashik) शेतकर्‍यांना पुरेशा प्रमाणात खते, बियाणे व औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभागाकडून नियोजन सुरू आहे. शेतकर्‍यांना काही अडचणी आल्यास, त्या सोडवण्यासाठी जिल्हा व विभागस्तरावर तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विवेक सोेनवणे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, नाशिक विभाग स्तरावरील तक्रारींचे निवारण करण्यासाठी दिलीप भोये यांची नियुक्ती केली असून, शेतकरी त्यांच्याशी 9518716806 या क्रमांकावर, तर जिल्हा स्तरावरील तक्रारींच्या निवारणासाठी लितेश येळवे यांच्याशी 8208561986 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

हेही वाचा :

Back to top button