पुढारी ऑनलाईन डेस्क
६४ व्या ग्रॅमी पुरस्काराचा सोहळा पार पडला. ग्रॅमी पुरस्कार हा सर्वात मोठा वार्षिक संगीत पुरस्कार सोहळा आहे. दरवर्षी या पुरस्कार वितरणाचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये नामवंत कलाकारांना त्यांच्या कामगिरीसाठी सन्मानित केले जाते. विशेष म्हणजे यंदा आरोज आफताब (Arooj Aftab) ही ग्रॅमी पुरस्कार जिंकणारी पहिली पाकिस्तानी महिला ठरलीय. संगीत क्षेत्रात अमूल्य कामगिरी केल्याने ती या पुरस्काराची मानकरी ठरलीय. (Arooj Aftab) आरोज एक गायिका आहे. ती याआधीही चर्चेत आली होती. २०२१ मध्येही या पाकिस्तानी गायिकेला दोन ग्रॅमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते.
ग्रॅमी पुरस्कार मिळाल्यानंतर, ती म्हणाली, "मला वाटते की मी बेशुध्द होणार आहे. व्वा, तुमचे खूप खूप आभार…."
ट्विटरवर अभिनेत्री माहिरा खानने आरोजच्या विजयावर एक पोस्ट शेअर केलीय. तिने लिहिले, "खूप अभिमान आहे! शाईन ऑन यु क्रेझी स्टार @arooj_aftab." आरोजला सर्वोत्कृष्ट नवीन कलाकार श्रेणीतही नामांकन मिळाले होते. पण हा पुरस्कार गायिका ऑलिव्हिया रॉड्रिगोने जिंकला होता.
ती म्हणाली, "मी खूप रोमांचित आहे. खूप छान वाटत आहे. मी दिवसभर खूप चिंतेत होते आणि आता आम्ही चांगली सुरुवात करत आहोत."
आरोज २००५ मध्ये अमेरिकेत बर्कली कॉलेज ऑफ म्युझिकमध्ये (Berklee College) संगीत शिकण्यासाठी गेली. तिने २००४ मध्ये तिचा पहिला अल्बम बर्ड अंडर वॉटर रिलीज केला. लोककला जाझ आणि मिनिमॅलिझम प्रकारात प्राचीन सूफी परंपरेच्या संगीत क्षेत्रात तिने काम केले. ही अमूल्य कामगिरी करून ३७ वर्षीय या गायिकेने जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.
सौदी अरेबियामध्ये पाकिस्तानी कुटुंबात जन्मलेल्या आरोजचे बालपण लाहोरमध्ये गेले. बर्कली स्कूल ऑफ म्युझिकमध्ये ती संगीत शिकण्यासाठी गेली. नंतर अभियांत्रिकी शिकण्यासाठी बोस्टनला गेली.