कोल्हापूर : पवारांचे राजकारण नेहमीच जातीयवादी : चंद्रकांत पाटील | पुढारी

कोल्हापूर : पवारांचे राजकारण नेहमीच जातीयवादी : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांनी नेहमीच जातीयवादी राजकारण केले आहे. राज ठाकरे योग्य तेच बोलले, असा घणाघात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केला. पाटील म्हणाले, राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाले. शरद पवार यांना जातीपातीचे राजकारण करायचे आहे, या राज ठाकरे यांच्या वक्तव्याशी मी दोनशे टक्के सहमत आहे.

संभाजीराजेंना भाजपने खासदार करताच पवार यांनी ‘आता पेशवे राजे ठरवायला लागले’, असे वक्तव्य करून ब—ाह्मण-ब—ाह्मणेतर असा रंग दिला. कोरेगाव भीमा घटनेवेळी पवारांचे वक्तव्य जातीयवादीच होते. पुणेरी पगडी घालताना त्यांनी पुणेरी नको, महात्मा फुले यांची पगडी हवी, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत पवारांचा जातीयवाद दिसून येतो. प्रत्येक विषयास ‘हिंदू-मुस्लिम’ ‘बहुजन-बाह्मण’ रंग आणायचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला.

पाटील म्हणाले, सर्वसामान्य घरातील व्यक्तीला दोन्ही काँग्रेसने कधीच मोठे केले नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना माझ्यासारखा गिरणी कामगाराचा मुलगा आठ खात्यांचे मंत्री झालेले सहन होत नाही, असा आरोप पाटील यांनी केला. संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजे बुडते जहाज आहे. या बुडत्या जहाजाचे कॅप्टनशिप कोण घेणार, असा टोला त्यांनी शरद पवारांना लगावला.

मी एक दिवस कोल्हापुरात येऊन 20 कार्यक्रम करतो. तुम्ही नेहमी डबक्यातील राजकारण करणार. तुम्हाला राज्याचे अध्यक्ष कुणी करणार नाही. तुम्ही कॅबिनेट मंत्री कधी होणार नाही. तुम्हाला केवळ कोल्हापूर महापालिका, झेडपी, गोकुळ याच्यातच इंटरेस्ट आहे, असाही टोला पालकमंत्री सतेज पाटील यांना चंद्रकांत पाटील यांनी लगावला. हतबल होऊन निवडणुकीच्या काळात तुम्हाला ‘गांधी’बाबांची मदत घ्यावी लागते. या निवडणुकीत त्याचा काही उपयोग होणार नाही, अशी व्यवस्था आम्ही केली आहे, असेही पाटील म्हणाले.

पालकमंत्र्यांनी जाहीरचर्चेची तारीख ठरवावी

भाजप सरकारच्या काळात झालेल्या विकासकामांची जाहीर चर्चा करण्यासाठी मी तयार आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी तारीख ठरवावी. बिंदू चौकात जाहीर सभा होत नाहीत. मिरजकर तिकटीला चर्चा करू. मी निश्चित येईन, अशा शब्दांत पाटील यांनी जाहीर चर्चेचा चेंडू पालकमंत्र्यांच्या कोर्टात टाकला.

पेटीएमच्या माध्यमातून मतदारांना पैसे पुरवण्याची पूर्वतयारी : पाटील यांचा आरोप

पाटील म्हणाले, एका शिक्षण संस्थेचे तरुण-तरुणी घरोघरी फिरून फॉर्म भरून घेत आहेत. निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. पेटीएमच्या माध्यमातून मतदारांना पैसे पुरविण्याची ही पूर्वतयारी असल्याचा आरोप त्यांनी केला. नागरिकांच्या खात्यावर पैसे आले कुठून, पाठविणार्‍याने आणले कुठून, याची चौकशी होईल. स्वत:चा ब्लॅक मनी या माध्यमातून मतदारांना देण्याचा प्रकार होईल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. याची तक्रार ईडी आणि निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ईडीच्या माध्यमातून या प्रकाराची चौकशी होईल. त्यामुळे नागरिकांनी एक हजार रुपयांसाठी चौकशीचे शुक्लकाष्ट मागे लावून घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

उद्यापासून भाजप नेत्यांच्या सभा

भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी चार व पाच एप्रिल रोजी आशिष शेलार, सहा एप्रिलला पंकजा मुंडे, सात एप्रिलला प्रवीण दरेकर, 9 आणि 10 एप्रिलला देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवले यांचे दौरे आणि सभा होणार आहेत.

Back to top button