विल स्मिथनं दिला ऑस्कर सदस्यत्वाचा राजीनामा, म्हणाला- परिणाम भोगायला तयार | पुढारी

विल स्मिथनं दिला ऑस्कर सदस्यत्वाचा राजीनामा, म्हणाला- परिणाम भोगायला तयार

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेता विल स्मिथने ९४ व्या ऑस्कर २०२२ पुरस्कार सोहळ्यात होस्ट ख्रिस रॉकला थप्पड लगावल्यानंतर या प्रकरणाची मोठी चर्चा झाली. त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू झाली होती. आता अभिनेता विल स्मिथने स्वतः ऑस्कर आयोजित करणाऱ्या अकादमीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, स्मिथचा राजीनामा ॲकॅडमीने स्वीकारला आहे.

शुक्रवारी रात्री अभिनेता विल स्मिथनेही एक निवेदन जारी केले. त्‍याने त्‍याच्‍या कृत्‍याबद्दल सर्वांची माफी तर मागितली. शिवाय सर्व प्रकारचे परिणाम भोगायला तयार असल्याचेही सांगितले. सूत्रांनुसार, तो म्हणाला की, मी माझ्या कृतीचे कोणतेही परिणाम स्वीकारण्यास तयार आहे.

९४ व्या ऑस्कर सोहळ्यात मी जे काही केले ते लज्जास्पद, धक्कादायक होते. मी ज्यांना वेदना दिल्या त्यांची यादी खूप मोठी आहे. त्यात ख्रिस, त्याचे कुटुंब, माझे अनेक मित्र यांचा समावेश आहे. अकादमीचा विश्वास दुखावल्याची भावना माझ्या मनात आहे. इतर विजेत्यांना माझ्यामुळे आनंद साजरा करण्याची संधी मिळाली नाही.

असे सांगितल्यानंतर स्मिथने अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. बोर्डाने कोणताही निर्णय घेतला तर ते मान्य करणार असल्याचेही ते सांगत आहेत. लॉस एंजेलिस येथे ऑस्कर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचा होस्ट ख्रिसने स्मिथच्या पत्नीच्या टक्कल पडण्याची खिल्ली उडवली. यावरून संतापलेल्या स्मिथने भर कार्यक्रमात जाऊन ख्रिसला थप्पड लगावली. त्यामुळे कार्यक्रमात गोंधळ उडाला. पण ख्रिसने विलला माफ केलं आणि त्याच्याविरोधात कोणतीही तक्रार केले नसल्याचे म्हटले.

 

Back to top button