सातारा :शिक्षण विभागातील अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना नोटिसा; सिईओंची कारवाई | पुढारी

सातारा :शिक्षण विभागातील अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना नोटिसा; सिईओंची कारवाई

सातारा : पुढारी वृत्तसेवा
एका महिला शिक्षिकेची तक्रार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे आल्यानंतर त्याची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना न दिल्याने तात्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, सहाय्यक, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, संबंधित कार्यासन लिपिक व आवक जावक लिपीकांना जिल्हा परिषदेमार्फत नोटिसा बजावून समाधानकारक खुलासा न आल्याने त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे महिला शिक्षिकेचे तक्रारी निवेदन प्राप्त झाले होते. या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी प्रस्ताव वेळेत केला नाही. तसेच या सर्व प्रकाराची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संबंधित विभागाकडून देण्यात आली नाही. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी तात्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, सहाय्यक, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, संबंधित कार्यासन लिपिक व आवक जावक लिपीकांना जिल्हा परिषदेमार्फत नोटिसा बजावल्या होत्या. मात्र याबाबत जबाबदार असणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांकडून खुलासा समाधानकारक आला नाही. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी अधिकार्‍यांवर ठपका ठेवला आहे. तर कर्मचार्‍यांना शिक्षा केली आहे.

तात्कालीन शिक्षणाधिकार्‍यांना गैरवर्तनाबाबत महाराष्ट्र नागरी सेवाशिस्त नियमातील तरतुदीनुसार ठपका ठेवणे ही शास्ती केली आहे. तर अन्य कर्मचार्‍यांना गैरवर्तनाबाबत जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा शिस्त व अपिल नियमानुसार एक वेतनवाढी पुढील वेतनवाढीवर परिणाम न करता तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याची शास्ती करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण विभागातील एकाचवेळी जबाबदार अधिकार्‍यासह कर्मचार्‍यांना नोटिसा बजावून त्यांच्यावर एकाच वेळी कारवाई केल्याने जिल्हा परिषदेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Back to top button