कर्नाटक : राहुल गांधींचे लक्ष्य ; अगले साल 156 | पुढारी

कर्नाटक : राहुल गांधींचे लक्ष्य ; अगले साल 156

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा
पक्ष संघटना मजबूत करा आणि सर्वांनी एकजुटीने लढून पुढील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 156 जागा निवडून आणा, असे लक्ष्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकातील नेत्यांपुढे ठेवले आहे. कर्नाटक विधानसभेच्या एकूण जागा 224 असून, त्यापैकी 156 जागा म्हणजे तब्बल 70 टक्के जागा काँगे्रसला जिंकाव्या लागणार आहेत. कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती कार्यालयाच्या आवारात आज काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत राहुल बोलत होते.

ते म्हणाले, काँग्रेसमधील प्रत्येकाने मनापासून काम करावे. याआधी काँग्रेसने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची माहिती सर्वांपर्यंत पोचवावी. पक्षनिष्ठा, पार्श्‍वभूमी, सध्या करत असलेल्या कामाची दखल घेऊन काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर केली जाईल. केवळ निवडणूक आणि 156 जागा जिंकणे हेच लक्ष्य असावे. देशामध्ये बेरोजगारी वाढत आहे. नोटबंदी, जीएसटी, कृषी कायदे, व्यापारातील मंदी अशा विविध पातळ्यांवर केंद्रातील भाजप सरकारला अपयश आले आहे. याबाबतची माहिती सामान्यांपर्यंत पोचवावी. लहान व्यापारी हतबल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराबाबत शद्बही उच्चारत नाहीत. कर्नाटकात असणारे भाजप सरकार 40 टक्के कमिशन घेत आहे. पण याकडे मोदींचे लक्ष नाही. कितीही तक्रारी केल्या तरी काहीच उपयोग झाला नसल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.

सामान्यांना वेठीस धरण्याचा प्रकार केंद्राकडून होत आहे. केवळ काही उद्योजकांचा विकास केला जात आहे. सामान्यांची मात्र दिशाभूल केली जात आहे. काँग्रेसकडून सर्व समाजांना एकत्र आणण्याचे काम केले जात आहे. राज्यात काँग्रेसने 70 लाख सदस्यत्व नोंदणी केली आहे. आता नव्या काँग्रेसची निर्मिती होत आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची ही वेळ असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.

महागाईकडे दुर्लक्ष

केंद्र आणि राज्य सरकारकडून सामान्यांच्या समस्या सोडण्याकडे दुर्लक्ष होत आहे. गेल्या काही दिवसांत प्रचंड महागाई वाढली आहे. सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. जीवनावश्यक वस्तू, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅस सिलिंडरसह विविध प्रकारची दरवाढ झाली आहे. याचा फटका सामान्यांना बसत आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकार काय करते आहे, असा प्रश्‍न राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

Back to top button