पॉप गायक दलेर मेहंदीनं Metaverse वर खरेदी केली प्रॉपर्टी, नाव ठेवलं 'बल्ले बल्ले'! | पुढारी

पॉप गायक दलेर मेहंदीनं Metaverse वर खरेदी केली प्रॉपर्टी, नाव ठेवलं 'बल्ले बल्ले'!

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूडचे पॉप गायक दलेर मेहंदी (Daler Mehndi) याने मेटाव्हर्स (Metaverse World) या आभासी जगात प्रॉपर्टी खरेदी केली आहे. यामुळे तो मेटाव्हर्स वर्ल्डमध्ये प्रॉपर्टी खरेदी करणारा पहिला भारतीय बनला आहे. दलेरने मेटाव्हर्स वर्ल्डवर खऱेदी केलेल्या प्रॉपर्टीला ‘बल्ले बल्ले लँड’ (Balle Balle Land) असे नाव दिले आहे.

याआधी दलेर मेहंदीने भारताचा पहिला मेटाव्हर्स कॉन्सर्ट देशाच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनीच्या निमित्ताने आयोजित केला होता. यामुळे Metaverse वर कार्यक्रम सादर करणारा तो पहिला भारतीय परफॉर्मर ठरला होता. याआधी जस्टिन बीबर आणि ट्रेव्हिस स्कॉट सारख्या आंतरराष्ट्रीय गायकांनी मेटाव्हर्सवर कार्यक्रम सादर केले आहेत. याआधी तामिळनाडूमध्ये एका जोडप्याचा लग्न सोहळा मेटाव्हर्सवर आयोजित केला होता. येथे वधू-वर यांच्यासह वऱ्हाडी मंडळी अवतार रुपात सहभागी झाली होती.

दलेरच्या या प्रॉपर्टीचे उद्घघाटन १८ मार्च रोजी होळीच्या दिवशी झाल्याचे सांगितले जात आहे. मेड इन इंडिया मेटाव्हर्स प्लॅटफॉर्म PartyNite वर खरेदी केलेल्या या प्रॉपर्टीवर लवकरच दलेर मेहंदीचा स्टोअर असेल. दलेरच्या या प्रॉपर्टीवर एक वेगळा पेंटबॉल एरिया आणि एक स्टोअर दाखवण्यात आला आहे. त्याचे नावे ‘मेहंदी स्टोअर’ असे ठेवण्यात आले आहे. या प्रॉपर्टीच्या माध्यमातून तो इव्हेंट, म्युझिक कॉन्सर्ट्सचे आयोजन करणार आहे. त्याने PartyNite ची यासाठी निवड केली आहे जेणेकरुन इंडियन मेटाव्हर्सला संपूर्ण जग पाहू शकते. एक महिन्यापूर्वी दलेरने याची माहिती इन्स्टाग्रामवर शेअर केली होती.

दलेर मेहंदीने (Daler Mehndi) प्रजासत्ताक दिनी मेटाव्हर्स कॉन्सर्टमध्ये नमो-नमो, इंडिया-इंडिया आणि जागो इंडिया सारख्या एव्हरग्रीन हिट्सवर परफॉर्म केला होता. हा कार्यक्रम जगभरातील २ कोटी प्रेक्षकांनी पाहिला होता. हा कार्यक्रम पाहण्यासाठी १५ लाख फॅन्सनी एकाचवेळी लॉगिंग केले. यामुळे सर्व्हर डाऊन झाला होता. दलेर मेहंदीचा देश-विदेशात मोठा फॅन फॉलॉव्हिंग आहे. ‘बोलो ता रा रा, तुनक तुनक तुन, हो जायेगी बल्ले बल्ले’ या सारखी त्यांची गाणी प्रचंड गाजली आहेत.

मेटाव्हर्स नेमकं आहे तरी काय?

मेटाव्हर्स हे इंटरनेटच्या त्या टप्प्याचा विकास आहे; जिथे वास्तवाला आभासी स्वरूप दिले जाईल. या आभासी जगात तुमचा आणि इतर अनेकांचा आभासी अवतार असेल किंवा प्रतिकृती असतील, ज्यांच्याशी आम्ही ३D रुपात संवाद साधू. पण, मेटाव्हर्सच्या या Augmented Reality च्या जगात एकमेकांना आभासी स्वरुपात भेटण्यासाठी, आपल्याकडे व्हीआर (Virtual Reality) हेडसेट असणे आवश्यक आहे. आज, जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या मेटाव्हर्समध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत आहेत. आज आपण वर्तमान जगात जसे एकमेकांना भेटतो; अशाप्रकारे मेटाव्हर्सच्या जगात आपण संवर्धित वास्तवात (Augmented Reality) एकमेकांना भेटू शकणार आहोत. या आभासी जगात आपला आणि आपल्या मित्रांचा आभासी स्वरुपात ३D अवतार (Avatars) असेल. त्यांच्याबरोबर आपण Metaverse मध्ये काहीही करू शकू, जे आपण वर्तमान जगात करू शकतो. मेटाव्हर्सवर आपण आपल्या मित्रांसोबत डिस्कोत धमाल करु शकतो. त्यांच्यासोबत आपण खेळाचा आनंद लुटू शकतो. चित्रपट पाहू शकतो. पण हे सगळे करण्यासाठी आपल्याकडे वीआर बॉक्स असणे गरजेचे आहे.

हे ही वाचा :

Back to top button